खासदार अमर काळे यांनी केलेल्या मागणीला यश
(अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्था भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या अधिन असून ही एक स्वायत्त संशोधन संस्था आहे. ही संस्था गांधीवादी विचारधारेला अनुसरून ग्रामिण उद्योग धंद्याचे बळकटीकरण करणे व यातून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम करते. या संस्थेच्या माध्यमातून चालविलेल्या उपक्रमाला चालना देण्याचे दृष्टीने सन १९५५ मध्ये जमनालाल बजाज, केंद्रीय अनुसंधान संस्थान या संस्थेची स्थापना करण्यात आली.
आधुनिक युगात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी व ती टिकविण्याच्या दृष्टीने के.व्ही. आय. सी. व आय. आय. टी. दिल्ली यांच्या संयुक्त प्रयत्नातून सन २००१ ते २००८ च्या दरम्यान जमनालाल बजाज केंद्रीय अनुसंधान या संस्थेचे महात्मा गांधी ग्रामिण औद्योगिकीकरण संस्थान (एमगिरी) या नावाने पुर्ननिर्मिती करण्यात आली. या संस्थेत सहा विभाग असून खादी व वस्त्रोद्योग, सेंद्रिय शेती, हर्बल आधारित उद्योग, ग्रामिण रासायनिक उद्योग, ग्रामिण शिल्प व स्थापत्य कला, ग्रामिण बुनियादी ढाचा व ऊर्जा या क्षेत्रात ही संस्था काम करीत आहे.
संस्थेने विकसित केलेल्या गोवंशावर आधारित पंचगव्य उत्पादने ही सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेमध्ये समाविष्ट करून शेकडो गोशाळेपर्यंत पोचविण्यात आली आहे. यामुळे कित्येक गोशाळा स्वतःच्या पायावर उभ्या असून सृजन रोजगार केंद्राच्या रूपाने पुढे आलेल्या आहेत. या संस्थेद्वारे मातीकला, धातुशिल्प, बांबू व लाकडी शिल्प, रेशिमोद्योग, ताग या क्षेत्रात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड एवढेच नाही तर देशातील मेघालय सारख्या राज्यात तसेच पूर्वेकडील दूरदूरच्या भागात या संस्थेने तेथील कारागिरांमध्ये क्षमता निर्माण करून त्यांच्याकडून कौशल्य विकासाच्या हेतूने काम करणारी एमगिरी ही एकमेव संस्था आहे.