आरोग्याची काळजी घेण्यासाठी अमृत महोत्सवासारख्या उपक्रमांचा लाभ घ्या : आमदार राजेश बकाने

देवळीत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वर्धा (जिमाका) : संसाराचा गाडा चालवितांना नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आजाराची लक्षणे दिसूनही उपचार पुढे ढकलले जातात आणि आजार बळावल्यानंतर रुग्णालय गाठले जाते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वेळेत आरोग्य तपासणी होणे आवश्यक असते. शासनाच्या आरोग्य अमृत महोत्सवासारख्या उपक्रमांचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार राजेश बकाने यांनी केले.

आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडियम, देवळी येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंग पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, तहसीलदार समर्थ क्षीरसागर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, निलेश पोहेकर, नागपूरचे न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी, डॉ. अमोल गोमासे, नरेंद्र मदनकर, प्रमोद ढोक आदी उपस्थित होते.

आमदार बकाने म्हणाले की, दैनंदिन धावपळीत अनेक नागरिक स्वतःच्या आरोगyाकडे दुर्लक्ष करतात. छातीत दुखणे, डोकेदुखी किंवा इतर त्रास होत असतानाही कामाच्या व्यापांमुळे डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते. शेती, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि कौटुंबिक जबाबदऱ्यांमध्ये नागरिक स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देत नाहीत. मात्र आजाराचे वेळेत निदान व उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्णांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग कार्यरत असल्याचेही आमदार श्री. बकाने यांनी नमूद केले.

आमदार सुमित वानखेडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा मतदारसंघांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी येथे आयोजित या शिबिरांधून तपासणी, शस्त्रक्रिया तसेच पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन व उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरत असल्याचे श्री. वानखेडे यांनी सांगितले. नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी शासनाच्या आरोग्यविषयक योजना गावपातळीवर पोहोचविण्याच्या प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी संजय गाते, डॉ. प्रमोद गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिबिराच्या सुरवातीला दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विविध आरोग्य तपासणी दालनांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान कार्ड तसेच चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी केले. संचालन डॉ. वाडिडभस्मे यांनी केले तर आभार गट विकास अधिकारी प्रफुल लोखंडे यांनी मानले. देवळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबिरास नागरिक, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *