पुुलगाव-आर्वी-वरुड या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजचे तसेच मतदार क्षेत्रातील रेल्वे विभागातील समस्यांबाबत खासदार अमर काळे यांनी वेधले रेल्वे मंत्र्यांचे लक्ष

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : संसदेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाशी चालू असलेल्या चर्चेत खासदार अमर काळे यांनी पुलगाव-आर्वी या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करून हा मार्ग वरुड पर्यंत दिल्ली लाईनला जोडण्याबाबत तसेच रेल्वे संबंधी असलेल्या मतदार संघातील विविध अडचणी लोकसभेमध्ये आज दि. १६.०३.२०२६ रोजी रेल्वे विभागाशी चालू असलेल्या चर्चेमध्ये मांडून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले. आपल्या मतदार संघातील मागण्यांबाबत बोलतांना खासदार अमर काळे यांनी प्रथम पुलगाव ते आर्वी हा नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतरण करून पुढे वरुड पर्यंत वाढविण्याच्या कामाला गती देऊन हे काम तात्काळ पूर्ण करून लोकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आग्रहपूर्वक आपली मागणी मांडली.

पुलगाव ते आर्वी ही रेल्वे गाडी सन १९१७ पासून इंग्रज राजवटीत सुरु झाली व ती १९९४-९५ या काळापर्यंत चालू होती. १९९४-९५ मध्ये ही गाडी बंद करण्यात आली. त्यामुळे आर्वी-आष्टी-कारंजा हा भाग रेल्वे सुविधांपासून वंचित झाला. त्यामुळे लोकांकडून हा मार्ग ब्रॉडगेज करून पुढे वरुड पर्यंत वाढविण्याची मागणी झाली. या मागणीला प्रतिसाद म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२४ मध्ये निवडणुकीच्या प्रचारात तळेगाव येथे आले असतांना या मार्गाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु निवडणुका झाल्या तेव्हापासून या कामाची कुठलीही प्रगती दिसत नसल्याने खासदार अमर काळे यांनी हा प्रश्न लोकसभेत उचलून धरला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलेल्या निवडणूक प्रचारातील आश्वासनाची संसदेमध्ये आपल्या मागणीतून आठवण करून दिली व या मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.

या मार्गावरून रेल्वे सेवा सुरु झाल्यास मुंबई किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांना व्हाया नागपूर-दिल्ली न जाता थेट या मार्गाने दिल्लीला जाता येईल. तसेच पुलगाव येथे मिलिट्री डेपो असून हा मार्ग सुरु झाल्यास पुलगाव येथील मिलिट्री डेपो व मध्यप्रदेशातील आमला मिलिट्री डेपो या दोन मिलिट्री डेपोमधील लष्करी साहित्याचे दळण-वळण आर्वी-पुलगाव-वरुड मार्गाने झाल्यास रेल्वेच्या १४५ कि.मी. च्या अंतर कमी होणार आहे. एवढेच नाही तर दारूगोळा वाहतुकीसाठी हा मार्ग मिलिट्री प्रशासनाच्या मते अत्यंत सुरक्षेचा समजला जातो व हा अनुभव सन १९७१ मध्ये त्यांनी घेतला आहे. त्यावेळी रेल्वे लाईन नसल्यामुळे व पुलगाव डेपोमधील साहित्य तातडीने आमला डेपोला हलवायचे असल्याने नाईलाजाने ही वाहतूक रस्ता मार्गाने करावी लागली होती. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता ह्या मार्गाचे काम तातडीने करण्यात यावे अशी खासदार अमर काळे यांनी संसदेत मागणी केली.

दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कोविड-१९ च्या काळात नागपूर ते बडनेरा व नागपूर ते हिंगणघाट या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या तर बऱ्याच गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. कोविड-१९ संपून चार ते पाच वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा अजून पर्यंत बंद केलेल्या रेल्वे गाड्या सुरु केल्या नाहीत तसेच बंद केलेले अनेक गाड्यांचे थांबे सुद्धा पूर्ववत करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हिंगणघाट येथील औद्योगिक क्षेत्र असतांना किंवा सिंदी रेल्वे सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्कसारखा महत्त्वाचा उद्योग असतांना गाड्यांचे थांबे नसल्यामुळे हिंगणघाटमधील एमआयडीसी किंवा सिंदी येथील लॉजिस्टिक पार्क यासारख्या उद्योगाची प्रगती होऊ शकली नाही तसेच संपूर्ण वाटचाल थांबली आहे. त्यामुळे बंद केलेल्या गाड्या पूर्ववत सुरु करून नागपूर बडनेरा व नागपूर हिंगणघाट या दरम्यान बंद केलेले थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी विनंती केली.

तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे पुलगाव येथील रेल्वे उड्डाणपुल पुलगाव येथून आर्वीकडे जाणारा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम करावयाचे असल्याने व या कामाचा १० ते १५ वर्षांपूर्वी कार्यादेश होऊनही या रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले नाही. उलटपक्षी या रेल्वेलाईनवरील रेल्वे फाटक १० ते १५ वर्षांपासून बंद करून रेल्वेलाईन पलीकडील व आर्वीकडे जाणारी वाहतूक रेल्वे विभागाने वळणमार्गाने सुरु केली आहे. सुरुवातीला हा पुल १० ते १२ वर्षांपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे संकल्पचित्र व अंदाजपत्रक सुद्धा मंजूर करून घेतले होते. परंतु सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने आता हे काम रेल्वे विभाग करणार असे कळते व आता या पुलाचे अंदाजपत्रक व संकल्पचित्र सुद्धा नव्याने करणार अशीही माहिती मिळाली. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने करावे व हा पूल लोकांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती खासदार अमर काळे यांनी केली.

यानंतर खासदार अमर काळे यांनी रेल्वे विभागाने रेल्वे लाईनवर बांधलेल्या अनेक अंडरपास विषयाची अडचणी मांडल्या. या विषयी अडचणी मांडतांना त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रेल्वेने अनेक अंडरपास बांधले परंतु पावसाच्या येणाऱ्या पाण्याचे निचरा करण्याचे नियोजन नसल्यामुळे या अंडरपासखाली पावसाळ्यात १० ते १२ फुट पाणी साचलेले असते. त्यामुळे या अंडरपासमधून होणारी वाहतूक पूर्णतः दोन ते तीन दिवस बंद असते. इतकेच नव्हेतर या अंडरपासमध्ये कमी जास्त प्रमाणात बारमाही पाणी साचलेले असते. पाण्याखाली असलेल्या रोडवर पाण्यामुळे खड्डे पडलेले असतात. वाहन चालकांना अंडरपासमधून पाण्यातून जातांना खड्डे दिसत नसल्यामुळे या खड्ड्यात वाहनांचे अनेक अपघात झालेले आहेत.

काही ठिकाणी जीवित हानी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री महोदयांनी या बाबींची सुद्धा दखल घेऊन अंडरपासखाली साचणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा याबाबतचे नियोजन करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशीही विनंती त्यांनी केली. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधीजींच्या नावाने ओळखला जातो. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची अनेक आंदोलने सेवाग्राम येथील आश्रमातून लढले आहेत. त्यामुळे महात्मा गांधीजींसारख्या थोर पुढाऱ्याचे ज्यांना राष्ट्रपिता या नावाने संबोधल्या जाते त्यांच्या नावाने हा जिल्हा जगात ओळखला जातो. त्यामुळे अशा जगाच्या नकाशावर असलेल्या वर्धा जिल्ह्यातील रेल्वे विषयी असलेल्या समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन त्या मार्गी लावव्या व माझ्या मतदार संघातील लोकांना आश्वस्त करावे अशीही विनंती त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *