वर्धा: बदलीच्या बदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेतले. सोमवारी २५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सेवाग्राम रोडवरील विभाग नियंत्रक कार्यालयात बदलीसाठी अर्ज केला होता. तिथे, विभागीय नियंत्रक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सचिन ज्ञानेश्वर चांदेकर यांची भेट घेतली.
आरोपी सचिन चांदेकर याने बदली करण्याच्या बदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितली. या संदर्भात, वर्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. आरोपीने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून सेवाग्राम पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई वर्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक राकेश साखरकर, पोलीस निरीक्षक संदीप मुपडे, पोलीस निरीक्षक कान्होपात्रा बन्सा, तसेच पंकज डहाके, मंगेश झामरे, सचिन गाढवे, राखी फुलमाळी, प्रशांत मानमोडे, प्रितम माने, विष्णू काळुसे व पोलीस कर्मचारी यांनी केली.