पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रमवर्धा (जिमाका) : पोलिस विभागासाठी जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर करण्यात आलेल्या वाहनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हे तपास करणे, गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी मदत होणार असून नवीन वाहनांमुळे पोलिसांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मनोबल उंचावेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस वाहन हस्तांतरण कार्यक्रमात केले.
पोलिस विभागाच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या निधी मधून पोलिस विभागास प्राप्त झालेल्या वाहनाचे हस्तांतरण व फिर्यादीस मुद्देमाल जप्त करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
वर्धा पोलिस विभागासाठी नुकतीच फॉरेसिंक लॅब मंजूर झाली असून सोबत राज्यात वर्धा येथे सायबर फॉरेसिंक रिसर्च सेंटर सुद्धा मंजूर झाले आहे. लवकरच सायबर फॉरेसिंक सेंटर तयार करण्यात येणार असून यामुळे गुन्ह्याचा तपास करण्यास मदत होणार आहे. शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरामुळे वाहतुकीला होणारा अडथळा, अपघाता होण्याची शक्यता असते. यासाठी वाहतूक पोलीस व नगर पालिका प्रशासनानी लक्ष केंद्रित करून उपाययोजना कराव्यात.
सध्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता असून पोलिसांनी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच युवकांमध्ये वाढलेले नशेचे प्रमाण कमी करण्यासाठी नशामुक्त जनजागृती मोहिम राबवावी अशा सुचनाही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यावेळी पोलिस विभागांना दिल्यात. यावेळी विविध गुन्ह्यात फिर्यादीचे जप्त केलेले सोने, चांदी, वस्तू व रोख रकमेचे पालकमंत्री यांच्या हस्ते फिर्यादींना वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी पोलिस अधीक्षक कार्यालय परिसर पालकमंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला पोलिस विभागातील अधिकारी, अंमलदार, पोलीस शिपाई, मोठ्या संख्यने उपस्थित होते.