प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारेआर्वी : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सालोद येथील टिपले कुटुंबावर काळाने अक्षरशः घाला घातला. रवी टिपले, त्यांची पत्नी सुष्मा टिपले, मुलगी जान्हवी तसेच वाहनचालक अंकुश राऊत यांच्यासह चार जणांचा दैवदुर्विलासाने मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. या हृदयद्रावक घटन्यानंतर खासदार अमर काळे यांनी आज सालोद येथे जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
सालोद येथील रवी टिपले यांचे कपड्यांचे दुकान असून, त्यांच्या मुलीला पुणे येथे एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी संपूर्ण कुटुंब स्वतःच्या वाहनाने पुण्याला गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलगी पुण्यातच थांबली, तर रवी टिपले, पत्नी सुष्मा दुसरी मुलगी जान्हवी गाडीने वर्ध्याकडे परत निघाले.
परतीच्या प्रवासात समृद्धी महामार्गावरील विरूळ इंटरचेंजजवळ समोर एक वाहन उलटल्यामुळे वाहतूक खोळबली होती. त्यामुळे त्यांच्या वाहनचालकाने गाडी थांबवली. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच क्षणात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सालोद येथील रवी टिपले, सुष्मा टिपले, मुलगी जान्हवी आणि वाहनचालक अंकुश राऊत यांच्यासह चार जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
या घटनेची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मात्र संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने त्यांना तत्काळ उपस्थित राहता आले नाही. अधिवेशनातून वेळ काढत आज त्यांनी सालोद येथे जाऊन टिपले कुटुंबाच्या घरी भेट दिली. या दुःखद प्रसंगात एकुलती एक उरलेली कन्या आणि इतर नातेवाईकांचे सांत्वन करताना वातावरण अत्यंत भाविक झाले. कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.
यानंतर खासदार अमर काळे यांनी वाहनचालक अंकुश राऊत यांच्या घरीही भेट दिली. अवघ्या तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या अंकुश राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबीयांचेही त्यांनी सांत्वन करून धीर दिला.
यावेळी बोलताना खासदार अमर काळे म्हणाले, ‘हा केवळ अपघात नाही, तर दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी वेदनादायी घटना आहे. या दुःखाची भरपाई कोणतीही मदत करू शकत नाही. मात्र शासनाच्या विविध योजनांमधून दोन्ही कुटुंबांना जी काही आर्थिक मदत मिळू शकते, ती मिळवून देण्यासाठी खासदार म्हणून आवश्यक तो सर्व पाठपुरावा मी स्वतः करेन. या कठीण प्रसंगी मी या कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.’
समृद्धी महामार्गावरील या भीषण अपघाताने संपूर्ण वर्धा जिल्हा हळहळला असून, सालोद गावात आजही शोककळा पसरलेली आहे. एका मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू झालेला प्रवास तिच्या आयुष्यात कायमची न भरून येणारी पोकळी निर्माण करून गेला. एका क्षणात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या लेकीचे दुःख आणि वडिलाविना वाढणाऱ्या एका वर्षाच्या चिमुकल्याचे भवितव्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.