17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर पर्यंत चालणार अभियान
वर्धा, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या जास्त असून ही जिल्ह्यासाठी खेदाची बाब आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्करने गरोदर मातांना पोषण आहाराचे महत्व समजावून सांगावे, त्याचबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहार बालकांना उपलब्ध करुन देऊन येणाऱ्या काळात जिल्ह्यात कुपोषण बालकांचे प्रमाण शून्यावर होण्यासाठी प्रयत्न करा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात 8 व्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे, सुनील गफाट, निलेश पोहेकर आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्यावतीने सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 पासुन आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव ठेवून पोषण अभियान राबविण्यास सुरुवात केली. सुरूवातीला हे अभियान सप्ताहभर राबविण्यात येत होते. परंतू यावर्षीपासून महिनाभर अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. अंगणवाडी सेविका, आशा, महिला व बाल क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला निरंतर कामात व्यस्त असतात. अशा महिलांना विरंगुळा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. अशा सूचनाही यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.
सद्याची पिढी फास्टफुडच्या आहारी गेली आहे. रासायनिक पध्दतीने पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाल्यामुळे लहान मुलांसोबतच वयस्क नागरिकांना देखील विविध आजाराला समोरे जावे लागत आहे. यासाठी पोषण आहारामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण वाढविण्यासाठी योग्य पोषण आहार नियमित घेतला पाहिजे. यामुळे शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. अभियानाच्या माध्यमातून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत होईल. असे पराग सोमण म्हणाले.
जिल्ह्यात 1 हजार 627 अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण माह अभियान राबविण्यात येत असून अभियानाच्या दैनंदिन कामकाजाच्या नोंदी अंगणवाडी सेविकांमार्फत ऑनलाईन घेण्यात येत आहे. महिला व बाल विकास मार्फत मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, लाडकी बहीण यासारख्या योजना राबविण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात मनिषा कुरसंगे म्हणाल्या. मागील वर्षाच्या तुलनेत कुपोषणात 52 टक्के घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पोषण आहार नियोजनाच्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन पल्लवी पुरोहित यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका, आशा उपस्थित होत्या.