प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा येथे आयोजित वर्धा टाईल्स अॅन्ड ग्रॅनाईट कंत्राटदार असोसिएशन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार अमर श. काळे यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार अमर काळे यांनी संघटन ही मोठी शक्ती आहे. संघटनेच्या प्रत्येक सदस्यांच्या सहयोगाने लहानशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होईल पण याला वेळ लागेल.
कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते. हळूहळू साकारून तिचे रुपांतर मोठ्या वटवृक्षामध्ये होते पण त्याला आवश्यक तो वेळ द्यावा लागतो.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सामाजिक दायित्व व समाजाचे दायित्व संघटनेमार्फत पाळल्या जावे एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संघटना सुरुवात करणे खूप सोपी आहे परंतु वेगवेगळ्या व्यक्तींना घेऊन व सांभाळून ती टिकविणे कठीण असते. परंतु ही संघटना टिकवली जाईल व नावारुपाला येईल अशी माझी अपेक्षा आहे. संघटनेत एकमेकांना सांभाळले तरच संघटनेची प्रगती होते.
त्यामुळे संघटनेत वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे सांभाळून चालू असलेले संघटन वाढविणे ही सुद्धा एक तारेवरची कसरत आहे. या संघटनेत विधी सल्लागार म्हणून अॅड महेश घाळे यांची सुद्धा भूमिका फारच महत्त्वाची आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला नगर परिषदेचे अध्यक्ष श्री. सुधिरभाऊ पांगुळ, विधी सल्लागार महेश घाळे, संघटनेचे अध्यक्ष सचिन उडाण व नेगी व संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.