खासदार निधीतून उभारलेल्या विहिरीचे उद्घाटन; अंध विद्यार्थिनी पल्लवी वानखेडे च्या गुणवत्तेचे कौतुक
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी सालोद येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाला सदिच्छा भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी सभागृहात मोठ्या संख्यने महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांनी सभागृहाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार अमर काळे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या आवारात उभारण्यात आलेल्या विहिरीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. या विहिरीमुळे सभागृह परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून सामाजिक, सांस्कृतिक व विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
भेटीदरम्यान परिसरातील महिलांनी मोठ्या आत्मीयतेने खासदार अमर काळे यांची भेट घेत आपल्या विविध अडचणी, विकासाकामांच्या मागण्या आणि स्थानिक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. प्रत्येक समस्या गांभीर्याने ऐकून संबंधित विषयांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन पासदारांनी दिले.
याचवेळी पल्लवी वानखेडे ही अवघी अकरा वर्षांची, दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेली गुणी विद्यार्थिनी खासदार अमर काळे यांना भेटली. पल्लवीने नुकत्याच नागपूर येथे झालेल्या गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून उत्कृष्ट क्रमांक पटकावल्याची माहिती तिच्या आईने खासदारांना दिली. तिच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि गायन कलेतील प्राविण्याने प्रभावित झालेल्या खासदार अमर काळे यांनी तिचे विशेष अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या पल्लवीसारखी मुले समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
नंतर खासदार अमर काळे यांनी अण्णाभाऊ साठे सभागृह व परिसराची सविस्तर पाहणी केली. हा परिसर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा असून त्याचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभागृह परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा, सुशोभिकरन, नागरिकांसाठी उपयुक्त विकासकामे आणि इतर सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. या भेटीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खासदार अमर काळे यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नागरिकांशी संवाद साधत विकासकामाना गती देण्याचा घेतलेला पुढाकार ग्रामस्थांनी स्वागतार्ह असल्याची भावना व्यक्त केली.