जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध
शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करून संबंधितांवर कारवाई तसेच विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी वर्धा जिल्ह्यातील आयटक सह विविध पुरोगामी, सामाजिक, कामगार, शेतकरी, विद्यार्थी व युवक संघटनांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्यने महिला एवं पुरुष सहभाग झाले होते.
दिल्ली येथे आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला ही अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचविणारी घटना आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा घेण्याचा आणि आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न संवाद, संवेदनशीलता आणि घटनात्मक मार्गाने सोडविले जाणे अपेक्षित असताना त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या घटनेमुळे देशातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोषची भावना निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. वर्धा येथेही अनेक दिवसांपासून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने होत आहे.
१. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या घटनेस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधत्मक उपाययोजना करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आपण आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
या गंभीर प्रकरणाची आपण तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अशी मागणी करण्यात आली. या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, किसान अधिकार अभियान अविनाश काकडे, आयटकचे मनोहर पचारे, वंदना कोळणकर, किसान सभेचे व्दारका इमडवार, महिला फेडरेशनच्या अनुराधाउटाणे, अगणवाडी युनियनचे विजया पावडे, मैना उईके, आशा संघटनेच्या रेखा तेलतुबडे, ज्योष्णा राऊत आदी उपस्थित होते.