वर्धा (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांसाठी शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून ही प्रक्रिया ३१ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. महिलांनी या कालावधीत केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यामध्ये लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपात सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नसणे, तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणताही सदस्य निवृत्तीवेतन घेत नसणे या अटींबाबत चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले होते. या कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर शासनाने अशा अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या पर्यायांमुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी या कालावधीत आपली माहिती काळजीपूर्वक तपासून दुरुस्त करावी. ही संधी अंतिम असून ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मुभा दिली जाणार नाही. त्यामुळे महिलांनी मुदतीत ई-केवायसी दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.