(अभय बेदमहोता)
सेलू : सेलू शहरातील गाजलेल्या घरफोडी व दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन अट्टल आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक जयसवाल लेआऊट, सेलू येथील रहिवासी राहुल गजानन फटिंग हे दि. १६ जुलै २०२६ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २.२६ लाखांचा ऐवज लांबवला होता.
या प्रकरणी सेलू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अत्याधुनिक तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अंसारी (वय २५, रा. यास्मिन प्लांट, समोसा ग्राउंड, बडा ताजबाग, नागपूर).
सोनू उर्फ मोहम्मद शाहिद माहमंद रशीद (वय २३, रा. गोटा ताजबाग, दर्गा जवळ, नागपूर). फैजान युनुस खान (रा. हिंगणघाट, जि. वर्धा).
शेख आफताब शेख अब्दुला उर्फ गोलू (फरार). (फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (एकूण किंमत ५,७१,६००)
सोन्या-चांदीचे दागिनेरोख रक्कम मारुती सुजुकी रिट्झ कार (MH-01-AL-7330) इतर मौल्यवान वस्तू असा आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक सोरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
यामध्ये पो.उपनि. आशिषसिंह ठाकूर, पो.उपनि. विजयसिंह गोमल्लाडु, पो.नि. योगेश कुमार लाडे, शेखर डोंगरे, अरविंद येणूरकर, जगदीश डफ, रोशन निमकर, रवी पुरोहित, सागर भोसले, विकास मुंडे, आशिष उमेकर, सुगम चौधरी, शुभम राजुत, अखिल इंगोले, रितेश गोळे, दिनेश बांधेकर, गोविंद मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.