प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या मतदार संघातील तसेच यवतमाळ व वर्धा येथील लोकांना दुरन्तो एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी वर्धा येथे थांबा नसल्याने नागपूर येथे जावे लागत होते. नागपूर येथे जाताना होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे अनेकदा बऱ्याच लोकांना दुरन्तो एक्सप्रेसने जाता आले नाही व त्यामुळे कित्येक लोकांच्या महत्वाच्या कामात व्यत्यय आल्याने तेथील नागरिकांनी खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, संजूभाऊ देशमुख व अमर शरदराव काळे यांच्याकडे दुरन्तोचा थांबा वर्धा येथे मिळण्याबाबत विनंती केली.
लोकांची अडचण लक्षात घेऊन दुरन्तोचा थांबा वर्धा येथे मिळण्याबाबत वर्धा-चंद्रपूर व यवतमाळ या तिन्ही खासदार व त्या मतदार संघातील लोकांच्या वतीने श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वे मंत्री मा. ना. श्री. अश्विनी वैष्णव यांना पत्र दिले व भेट घेतली. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीला रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन दुरन्तो एक्सप्रेसला वर्धा येथे दि. १५.०४.२०२६ पासून थांबा मंजूर करण्यात आला.
दि. १५.४.२०२६ ला वर्धा रेल्वे स्टेशनवर दुरन्तो एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविण्याबाबत रेल्वे विभागाने कार्यक्रम ठेवून या कार्यक्रमाला खासदार अमर श. काळे यांना रितसर निमंत्रण देऊन गाडीला हिरवी झेंडी दाखविण्याकरिता निमंत्रित करण्यात आले होते. हा कार्यक्रम वर्धा येथील मुख्य रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ वर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना खासदार अमर काळे यांनी दुरन्तो एक्सप्रेस वर्धा येथे थांबणार असल्याने माझ्या मतदार संघातील दुरन्तो एक्सप्रेसने जाताना नागपूरला न जाता आता वर्धा रेल्वे स्टेशन वरूनच थांबा मिळाल्याने वर्ध्यावरूनच बसण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्वतः खासदार म्हणून तसेच मतदार संघातील लोकांच्या वतीने जाहीर आभार मानले. त्यासोबतच त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या उपस्थित नेत्यांना आवाहनही केले तुमच्या पक्षातील सत्ता असल्याने कोरोना काळात बऱ्याच रेल्वे गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते. आता कोरोना पूर्णतः संपूष्टात आल्याने रेल्वेचे थांबे पूर्ववत करण्यात यावे अशीही विनंती त्यांनी केली.
मंचावर उपस्थित सत्ताधारी पक्षाचे नेते रावसाहेब दानवे, पालक मंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस व सुरेश वाघमारे यांनाही विनंती केली. कोरोना पूर्वीचे स्टॉपेज मिळविण्याकरिता तुम्ही सर्वांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विनंती करावी व कोरोना पूर्वीच्या काळात वर्धा ते अमरावती दरम्यान तसेच सेवाग्राम स्टेशन वरून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे हिंगणघाट येथील थांबे पूर्ववत करण्याबाबत आपण रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन प्रयत्न करावे या लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून या मागणीला माझा पूर्ण पाठींबा असून मी आपल्या सोबत राहीन. रेल्वे मंत्रालयाच्या चर्चेत गेल्या तीन ते चार अधिवेशनापासून मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे. अनेकदा पत्रव्यवहारही झाला, रेल्वे मंत्र्यांसमवेत भेटी सुद्धा झाल्या, वारंवार या प्रश्नाची मागणी झाली परंतु मागण्यांना उत्तरे देतांना रेल्वे मंत्र्यांनी या मागणीचा साधा उच्चार सुद्धा आपल्या उत्तरात केला नाही. त्यामुळे ही वर्धा जिल्ह्याची एक मोठी शोकांतिका झालेली आहे. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे वर्धा जिल्ह्यात वरूड येथे महात्मा गांधीजींचा आश्रम आहे. अनेक स्वातंत्र्य पूर्वीची आंदोलने महात्मा गांधींनी या आश्रमातून लढलेली आहे.
बराच काळ त्यांचे या आश्रमात वास्तव्य होते. त्यांनीच या गावाला सेवाग्राम हे नाव दिलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या आश्रमात अनेक स्वातंत्र्य सेनानी मोठमोठे स्वातंत्र्य चळवळीतील नेते सेवाग्राम येथील बापूकुटीत गांधीजींना भेटायला येत होते. त्यामुळे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने सेवाग्राम येथे रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. या सर्वांची आठवण म्हणून पूर्वीची नागपूर-दादर ही रेल्वे गाडी सेवाग्राम एक्सप्रेस या नावाने सुरु करण्यात आली. शोकांतिका म्हणजे अशा या महात्मा गांधीजींच्या त्यांना आपण राष्ट्रपिता समजतो त्या गांधीजींच्या सेवाग्राम येथील आश्रमाच्या नावाने सुरु केलेल्या सेवाग्राम एक्सप्रेसला सेवाग्राम रेल्वे स्टेशनवर थांबा नसणे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. विशेष म्हणजे इतिहास जपायचा पण तो अर्थवटच केवळ नाव देऊन भागविणे योग्य नाही.
सेवाग्राम नावाने सुरु केलेली गाडी एक तर ती सेवाग्राम रेल्वे स्टेशनपासूनच मुंबईकडे जाणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक अडचणी सोडल्या तर या गाडीला कमीत कमी सेवाग्राम नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकावर पाच मिनिटाचा थांबा देणे तरी रेल्वे मंत्र्यांकडून अपेक्षित होते. पण दुर्दैवाने आजपावेतो तेही होऊ शकले नाही. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, सेवाग्राम स्टेशनवर थांबा देणे, नागपूर ते बडनेरा दरम्यान कोरोना काळा पूर्वीचे असलेले थांबे पूर्ववत सुरु करावे या मागणीकरिता माजी रेल्वे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून पंकज भोयर, सत्ताधारी पक्षाचे माजी खासदार रामदासजी तडस व सुरेशभाऊ वाघमारे यांनी सामूहिक प्रयत्न करावे व या दोन्ही मागण्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेकडून मंजूर करून घ्यावे. या जिल्ह्याचा खासदार म्हणून या दोन्ही मागण्यांना माझा पूर्ण पाठींबा असेल व माझा पूर्ण पुढाकार राहील असेही आश्वासन खासदार अमर काळे यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून व्यक्त केले.
यानंतर दुरन्तो एक्सप्रेसचे वर्धा स्टेशनवर आगमन झाले. एक मिनिटाचा थांबा देऊन खासदार अमर काळे यांनी दुरन्तो एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाकरिता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या प्रसंगी पालक मंत्री पंकज भोयर, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी खासदार रामदास तडस व सुरेश वाघमारे, सुनिल राऊत, शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, संदीप किटे, जितेंद्र शेटे, अजय डोंगरे, सुनिल तळवेकर, सलीम कुरेशी, विजय घवघवे, मित्तल साहेब, संजयजी मुळे, श्री. रविकुमार मिश्रा, अरुणकुमार सिंग, अभय पुनवटकर यांचे सह बरीचशी मान्यवर मंडळी, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.