आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते होणार उद्घाटन
वर्धा (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील पहिल्या भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन २२ ते २४ जुलै रोजी बच्छराज धर्मशाला प्रांगण, शास्त्री चौक, वर्धा येथे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे, आ. डॉ. मनिषा कायंदे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. अरुण लखाणी, आ. रवींद्र चव्हाण, आ. समीर कुणावर, आ. राजेश बकाने तसेच आ. सुमित वानखेडे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांना विविध आजारांचे मोफत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, हृदयरोग तपासणी, ईसीजी, स्त्रीरोग, दंतरोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग तसेच संसर्गजन्य रोगांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय रक्त तपासणी, मानसिक आरोग्य सल्ला, औषध वितरण, मोफत चष्म्यांचे वाटप, दिव्यांगांना साहित्य वितरण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी व लाभार्थी सहाय्य केंद्रही कार्यरत राहणार आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र तपासणी कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून नोंदणीपासून उपचार व औषध वितरणापर्यंत सर्व सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नागरिकांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी नोंदणी व्यवस्था पार्किंग शेड क्रमांक १ ते ७ तसेच पुरुषांसाठी नोंदणी पार्किंग शेड १ ते १४ मध्ये करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक व हृदयरोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्रमांक १०, ११, १२ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १३ मध्ये करण्यात आली आहे. ईसीजी तपासणी महिलांसाठी कक्ष क्र. ९ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १४ मध्ये करण्यात आली आहे. स्त्री रोग तपासणी कक्ष क्र. ८, दंत तपासणी महिलांसाठी कक्ष क्र. ७ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १५, अस्थिरोग व कर्करोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्र. ६ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १६, त्वचा रोग तपासणी महिलांसाठी कक्ष क्र. ५ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १७, कान, नाक, घसा तपासणी महिलांसाठी कक्ष क्र. ४ तर पुरुषांसाठी कक्ष क्र. १८, रक्त तपासणी कक्ष क्र. ३ मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
औषध वितरण महिलांसाठी कक्ष क्र. २ व पुरुषांसाठी कक्ष क्र. १९, चष्मे वाटप महिलांसाठी कक्ष क्र. १ व पुरुषांसाठी कक्ष क्र. २० मध्ये दुपारी २ नंतर करण्यात येणार आहे. मानसोपचार कक्ष क्र. २२ मध्ये करण्यात येणार आहे. रक्तदान लहान हॉलमध्ये, नेत्र तपासणी मोठ्या हॉलमध्ये, संसर्गजन्य रोग तपासणी व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी लाभार्थी सहाय्य कक्ष खुल्या जागेत करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे आणि या दुर्मीळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.