शिक्षण राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या संकल्पनेतील ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मंजुरी

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी राज्यभर राबविणार अभिनव योजना
मुंबई/वर्धा : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला अखेर शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. शालेय शिक्षण विभागाने ६ मे २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून राज्यभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोगांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकापुरते शिक्षण न राहता प्रत्यक्ष प्रयोग, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, या उद्देशातून ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ ही संकल्पना त्यांनी मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर राज्य शासनाने या उपक्रमाला हिरवा कंदील दिला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना नासा, इस्रो, रमण विज्ञान केंद्र, पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर, नेहरू तारांगण केंद्र मुंबई भेटी देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग, विज्ञान प्रदर्शन, मॉडेल्स, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती अनुभवातून मिळणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून विज्ञान शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शासन निर्णयानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या तसेच विविध वैज्ञानिक संस्था यांचे समन्वयाने नियोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह प्रवास, मार्गदर्शन आणि शैक्षणिक उपक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात येणार आहे.

‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ या उपक्रमामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शिक्षणाबद्दल नवचैतन्य निर्माण होणार असून भविष्यात संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रात महाराष्ट्राला सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी प्रथम येणा-या सहा असे एकूण २१४८ विद्यार्थी व २० पर्यवेक्षकांना राज्यातील विज्ञान केंद्राला भेटी देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा स्तरावरील सर्व गटातील १८० विद्यार्थी व ८ पर्यवेक्षक अथवा शिक्षक बंगळूर येथे इस्रो केंद्राला व राज्यस्तरावरील विज्ञान प्रदर्शनीतील उत्कृष्ट ५१ विद्यार्थी, एक शिक्षक, एक शिक्षिका, दोन प्रशासकीय अधिकारी अथवा समन्वयक असे एकूण ५५ जणांना अमेरिका येथील नासा केंद्राला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना विज्ञानाधिष्ठित विचारसरणीची गरज
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर नव्हे तर विज्ञानाधिष्ठित विचारसरणीची गरज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी, विज्ञानाची भीती दूर व्हावी आणि नवकल्पनांना चालना मिळावी, हा मुख्यमंत्री विज्ञान वारीचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची समान संधी मिळावी यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरेल. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्र अधिक गुणवत्तापूर्ण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. विज्ञान वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव मिळेल. विज्ञान शिकण्याची पद्धत अधिक रंजक आणि व्यवहार्य बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

— डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *