गेल्या ३० वर्षापासून रखडलेला प्रश्न खासदार अमर काळे यांनी मार्गी लावला, सर्वच स्तरातून अभिनंदन
वर्धा : लोकसभा मतदार क्षेत्रातील व आर्वी विधानसभा मतदार संघाचे दृष्टीने महत्वाचे पुलगाव-आर्वी नॅरोगेज चे ब्रॉडगेज मध्ये रुपांतरण करुन हा ब्रॉडगेज मार्ग वरुड पर्यंत वाढविण्याचे काम अखेर खासदार अमर काळे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा पत्रव्यवहार, लोकसभेतील पोटतिडकीने प्रश्न मांडणे व आपली मागणी कशी महत्वाची आहे हे पटवून सांगण्याचे कसब यामुळे हा महत्वाचा व जटील प्रश्न अखेर मार्गी लागला. रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाकरीता अर्थसंकल्पात रु. २.४९ कोटीची तरतूद केली आहे. पुलगाव-आर्वी रेल्वे नॅरोगेज मार्गावरून सन १९१७ मध्ये इंग्रजांच्या काळात ही रेल्वे सुरु झाली होती व ती सतत सन २००५ पर्यंत सुरु होती. परंतु अचानक ही रेल्वे बंद केल्याने आर्वी-आष्टी-कारंजा हा भाग रेल्वे सुविधेपासून वंचित झाला. आर्वी ही विदर्भातील महत्वाची कापसाची बाजारपेठ असल्याने रुई गाठी वाहतूक करणे तसेच मध्य रेल्वे लाईनला आर्वी शहराशी जोडणारी महत्वाची रेल्वे होती.
खासदार अमर काळे सन २०२४ ला निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम या मुद्यावर अधिक लक्ष घालून त्यावर भर दिला व मार्च २०२५ च्या संसद सत्रात त्यांनी हा मुद्दा लोकसभेत उचलून धरला व सर्व मतदार संघाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. केवळ बोलून थांबले नाहीत तर सतत रेल्वे मंत्र्यांशी भेटीगाठी व पत्रव्यवहार प्रत्येक दिल्लीवारींत सुरुच होता. पुन्हा त्यांनी मार्च २०२६ च्या अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उचलून धरला व यावेळी त्यांनी नागपूर मार्गाऐवजी हा मार्ग झाल्यास या मार्गावरून वर्धा ते आमला अंतर १०५ कि.मी. ने कमी होणार एवढेच नव्हे तर सन १९७१ मध्ये युद्धाचे काळात पुलगाव मिलट्री डेपो शत्रुचे निशाण्यावर असल्याने साहित्य तात्काळ आमला डेपोत हलविण्याच्या सुचना होत्या. लष्करी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार पुलगाव-नागपूर-आमला हा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही व अंतर पण १०५ कि.मी. ने जास्त आहे. यामुळे पुलगाव-आर्वी-वरुड -आमला हाच मार्ग सुरक्षित मानल्या गेला व अंतर पण १०५ कि.मी. ने कमी त्यामुळे रेल्वे मार्ग सोडून पुलगाव-आर्वी-वरुड या रस्ता मार्गाने पुलगाव डेपोमधील साहित्य आमला येथे हलविण्यात आले होते. ही बाब खासदार अमर काळे यांनी लोकसभेतच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांना भेटून त्यांना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग कसा सुरक्षित व आवश्यक आहे हे पत्र देऊन या सर्व बाबी प्रत्यक्षात सांगून या मार्गाचे महत्व पटवून दिले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी या बाबीची गंभीरतेने दखल घेतली व शेवटी पुलगाव-आर्वी हा मार्ग ब्रॉडगेज करुन पुढे वरुड पर्यंत वाढविण्याबाबत तत्वतः मंजुरी दिली असून या ब्रॉडगेज मार्गाकरीता रु. २.४९ कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.
त्यामुळे खासदार अमर काळे यांच्या खासदारकीच्या कार्यकाळातील पुलगाव-आर्वी ब्रॉडगेज मार्ग व पुढे हा वरुड पर्यंत वाढविण्याचे काम मार्गी लागून अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याने म्हणजेच मैलाचा दगड ठरणार यात तिळमात्र शंका नाही.
पुलगाव-आर्वी या ब्रॉडगेज मार्गाचे काम म्हणजे लोकांना एक दिवा स्वप्न झाले होते. लोकांनी मागणी करुन सरकार हा प्रश्न मनावर घेत नसल्याने या मार्गाविषयी लोकांनी आशा सोडली होती व ही रेल्वे इतिहास जमा होण्याचे मार्गावर आली होती. पण खासदार अमर काळे यांनी आपले राजकीय कसब पणाला लावून व एखादी गोष्ट करायची ठरविली की, ती झालीच पाहिजे मग त्यासाठी कितीही कष्ट उपसावे लागले तरी चालेल पण कामात यश हे मिळवायचेच हा खासदार अमर काळे यांचा स्वभाव व याच स्वभावाच्या जोरावर त्यांनी आपल्या वर्धा लोकसभा मतदार संघाच्या खासदारकीच्या जोरावर पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे मार्गाकरीता अर्थसंकल्पात तरतूद करुन एक यशाची पायरी गाठली असे म्हणावयास हरकत नाही.
पुलगाव-आर्वी पर्यंत हा नॅरोगेज मार्ग ब्रॉडगेज करण्याकरीता स्टेशन व सर्वच इन्फ्रा तयार असून भूसंपादनाची काहीही गरज नाही. त्यामुळे पुलगाव-आर्वी-वरुड या मार्गावरील स्टेशन निश्चिती, वाहतूक सर्वेक्षण व रेल्वे लाईन अलाईनमेंट सर्वेक्षण झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे व हा प्रस्ताव मंजुरीकरीता सादर केला गेला असल्याचे रेल्वे विभागाकडे चौकशी अंती कळले. त्यामुळे उशिरा का होईना आर्वी-आष्टी-कारंजा-वरुड या भागातील लोकांना रेल्वे सुविधा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत व याचे संपूर्ण श्रेय जाते ते खासदार अमर काळे यांना व त्या जनतेला ज्यांनी त्यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस कष्ट उपसले त्या मायबाप जनतेला. कारण त्यांनी दिलेल्या मतांच्या जोरावरच अमर काळे यांना हा प्रश्न लोकसभेत मांडण्याचे अधिकार मिळाले हे विसरुन चालणार नाही. या मार्गाचे काम मार्गी लावून महात्मा गांधीजींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात ही पुलगाव-आर्वी-वरुड गाडी ज्या दिवशी या मार्गावरून धावेल त्यावेळी आर्वी-तिवसा व वरुड विधानसभा मतदार संघाकरीता हा दिवस ऐतिहासिक ठरणार हे निश्चित. याबाबत खासदार अमर काळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंग व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानून या मार्गाचे काम तातडीने करुन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या २०२९ चा कार्यकाल संपण्यापूर्वी या मार्गाचे लोकार्पण करुन हा मार्ग लोकांच्या सेवेत आणावा अशीही अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.