रोठा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे निर्देश

विशेष सरकारी अभियोक्तांची होणार नियुक्ती

प्रतिनिधी/दै.प्रतापगडचे वारे
वर्धा : रोठा येथील संतापजनक घटनेची सुनावणी जलद गती न्यायालयात तसेच या प्रकरणात विशेष अभियोक्ता यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी केली. सदर बाबीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेत विधि व न्याय सचिवांना यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय बालकेवर झालेल्या अत्याचार व खूनाच्या अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेत सुरुवातीपासून या प्रकरणाचा नियमित पाठपुरावा केला. पीडितला आणि तिच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने त्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच राज्य शासन स्तरावर सातत्याने आवश्यक सूचना व निर्देश दिले. घटना उघडकीस आलंनंतर डॉ. पंकज भोयर यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून आरोपीचा त्वरित शोध घेऊन त्याला अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. पालकमंत्री यांच्या निर्देशानंतर पोलीस यंत्रणेने वेगाने हालचाली करत काही तासांच्या आतच आरोपी राहुल मडावी (रा. रोठा) याला अटक करण्यात यश मिळविले. याचबरोबर या गंभीर प्रकरणाची चौकशी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता पूर्ण करण्यात यावी, दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात यावे तसेच तपास अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सर्वंकष होण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याचे आदेशही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले होते.

संपूर्ण तपास प्रक्रियेवर त्यांनी सातत्याने लक्ष ठेवून संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा घेतला. रोठा येथील या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उचडली होती. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, यासाठी वर्धेकर रस्त्यावर उतरले होते.

या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असण्याची भूमिका डॉ. पंकज भोयर यांनी सातत्याने मांडली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा त्वरीत व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची सुनावणी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात करण्यात यावी तसेच विशेष सरकारी अभियोक्ता यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदन सादर करून या प्रकरणातील संवेदनशीलता, समाजमध्ये निर्माण झालेली तीव्र भावना तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी डॉ. भोयर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिवांना या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी व विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्ती करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला असून पीडितला न्याय मिळण्याच्या अपेक्षा अधिक बळकट झाल्या आहेत.

या संपूर्ण प्रकरणात पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सुरुवातीपासून सक्रिय भूमिका घेत तातडीची पोलीस कारवाई, एसआयटी चौकशी, नियमित आढावा आणि आता फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीसाठी मुख्यमंत्री स्तरावर केलेला पाठपुरावा यामुळे या प्रकरणाला गती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *