१ लाख ७६ हजारांहून अधिक पाकिटांची विक्री

जिल्ह्यात पाच लाख ३८ हजारांवर पॅकेट कापूस बियाणे उपलब्ध

कापसासोबत इतरही बियाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता

वर्धा : वर्धा जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत. त्यातही कापसाचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कापूस लागवडीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ३८ हजार ९३१ कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी १ लाख ७६ हजार ८४० कापूस बियाणे पाकिटांची विक्री झाल्याची माहिती समजते.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तथापि, हंगामाला सुरूवात झाल्यानंतर बियाणे खरेदीला वेग येईल. जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या कापूस बियाण्यांचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील परवानाधारक विक्रेत्यांमार्फत बियाण्यांचे वितरण सुरू ठेवण्यात आले आहे.

वर्धा जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापूस पिकावर अवलंबून आहेत. त्यामुळे दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा आणि उपलब्धता ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात कपाशीच्या नऊ लाखांवर पॅकेट्स बियाण्याची मागणी आहे. सध्या जिल्ह्यात पाच लाख ३८ हजारांवर कपाशी बियाण्यांचे पॅकेट्स उपलब्ध झाले आहेत. कृषी केंद्रांमधून कपाशीच्या बियाण्यांची विक्रीदेखील सुरू झालेली आहे. या कालावधीत एक लाखांवर पॅकेट्सची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी बहुतांश शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे सध्या तरी बियाणे खरेदीची लगबग सुरू झाल्याचे चित्र नाही. हंगामाच्या कालावधीत बियाणे खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी शिवा जाधव यांनी केले आहे. कपाशीसोबत तूर, सोयाबीनचेही बियाणे उपलब्ध झाले आहे. तसेच इतरही पिकांचे बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *