धाडीला पोस्ट ऑफिसची ऐतिहासिक भेट; पुलगाव-वरूड या रेल्वे मार्गाबाबत सतत पाठपुरावा करून दुसरी ऐतिहासिक भेट देण्याचा संकल्प

कारंजा : तालुक्यातील धाडी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी बोलताना खासदार काळे यांनी धाडीसह परिसरातील विकासकामांना प्राधान्य देण्याची ग्वाही देत पोस्ट ऑफिस हे केवळ पत्रव्यवहाराचे केंद्र नसून सामान्या नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविणारे महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले.

धाडी येथे पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे गावासह परिसरातील नागरिकांना बँकिंग सुविधा, बचत योजना, विमा सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या उदा. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मिळणारे पिक विमा, नमो योजनेचे मिळणारे अनुदान, यासह इतर विविध योजनांचा लाभ आता गावातच उपलब्ध होणार आहे. आष्टी तालुका हा तसाही जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका असून या तालुक्यात जवळपास ४५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यातून धाडी येथे पोस्ट ऑफिस मंजूर होऊन व ते गावातील सरपंच दिलीप भाकरे यांच्या सततच्या मागणीमुळे व खासदार अमर काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर होणे या बाबीची नोंद इतिहासात घेतल्या जाईल व त्यामुळे दिलीप भाकरे यांची सरपंच पदाची कारकीर्द कायमस्वरूपी या गावातील लोकांच्या चिरकाल स्मरणात राहील, त्यामुळे नागरिकांची शहरांवरील धावपळ कमी होऊन ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी खासदार काळे यांनी पुलगाव-आर्वी-वरूड रेल्वे मार्गाबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली. खासदार म्हणून या रेल्वे प्रकल्पाच्या सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर या मार्गाला मंजुरी मिळाली असून सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने थोडा का होईना परंतु रु. २.५ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुलगाव-आर्वी-वरूड हा रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा असून लोकांच्या रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने नव्हे तर संरक्षण विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून त्याबाबत आपण देशाचे संरक्षण मंत्री मा. राजनाथसिंगजी यांना प्रत्यक्ष भेटून ही बाब स्पष्ट केली. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडार व आमला येथील दारूगोळा भांडार या रेल्वे मार्गामुळे जोडले जाणार असून हा रेल्वे मार्ग झाल्यास पुलगाव-आमला अंतर हे जवळपास १३० कि.मी. ने कमी होणार आहे व अंतर कमी होणार नसून हा मार्ग दारूगोळा भांडारातील साधन सामग्री, वाहतूक करण्याच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित मानला गेला आहे हे संपूर्ण संरक्षण विभागाला माहीत असून याची प्रचिती १९७२ च्या युद्धाच्या वेळी आलेली आहे.

ही बाब सुद्धा खासदार अमर काळे यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांना प्रत्यक्ष भेटून पटवून दिली आहे. एवढेच नाही तर या मार्गामुळे आपल्या माला वाहतूक, उद्योग, स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल, एवढेच नाही तर या भागात रेल्वे वाहतूक सुरू झाल्यास मोठे उद्योग सुद्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही खासदार अमर काळे यांनी सांगितले. संबंधित केंद्रीय स्तरावर प्रभावी मांडणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मार्गामुळे आमला आणि पुलगाव मिलिटरी डेपो यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे, तसेच आमला-पुलगाव वाहतूक या मार्गाने वळविल्यास सुमारे १३० किलोमीटरचे अंतर कमी होणार असून मालवाहतूक, उद्योग आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल. आर्वी व वरूड परिसरातील नागरिकांची रेल्वेची अनेक वर्षांची मागणीही या प्रकल्पामुळे पूर्ण होणार असल्याचा विश्वास खासदार काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती ईश्वर वरकड, ग्रामपंचायत धाडीचे सरपंच दिलीप भाकरे, डाकघर अधिक्षक श्री निकम, आर्वी येथील डाकघर अधिक्षक सिन्हा, धाडी येथील बाबाराव भिसे, बाबाराव लांडे, अवधूत शेंदरे, मंदाताई धुर्वे, उपसरपंच राहुल गावंडे, आकाश मडावी, रोशनी ठाकरे, सविता ठाकरे, सुनिता वानखेडे, नमुताई खोडे, विलास राऊत, गजानन गायकवाड यासह गावातील गावकरी व मान्यवर मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन स्वाती शेंदरे यांनी केले.

या कार्यक्रमानंतर खासदार अमर काळे यांनी धाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य श्री वामनरावजी गावंडे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांचे घरी सांत्वनपर भेट दिली. श्री वामनराव गावंडे हे डॉ. शरदराव काळे यांचे कार्यकाळातील पंचायत समिती सदस्य असून ते डॉ. शरदराव काळे घराण्याचे त्यांचे काळापासून तर आजपावेतो सतत कट्टर समर्थक होते, त्यामुळे खासदार अमर काळे यांनी वामनराव गावंडे यांचे घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *