विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची मागणी
सेलू : वर्धा-येळाकेळी-सुरगाव व्हाया सेलू मार्गावरील बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू करावी, या मागणीने आता जोर धरला आहे. मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावर एसटी महामंडळाची सेवा बंद असल्याने नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे, सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आगामी काळात शाळा-महाविद्यालये सुरू असून पावसाळ्याचे दिवस पाहता, बस सेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
काही दिवसांतच शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. मात्र, बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पावसाचा जोर वाढल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात रस्ते तुटलेले असल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अनेकांना तर पाऊस वाढल्यास घरीच बसावे लागते, ज्यामुळे त्यांचे हक्काचे शिक्षण बुडत आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज
शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत जर राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुरू झाली, तर विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल आणि शैक्षणिक नुकसानही टळेल. बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्याचा आर्थिक फटकाही त्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील जनतेची ही समस्या लक्षात घेता, प्रशासनाने या मार्गावरील बस सेवा त्वरित पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिक व विद्यार्थी वर्गातून जोरकसपणे होत आहे.