प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा संबंधित अधिकारी व जबाबदार कर्मचारी आपल्या टेबलवर उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी वर्धा यांनी तात्काळ लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक घटकांकडून करण्यात येत आहे.
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वर्धा, पंचायत समिती वर्धा, तहसीलदार कार्यालय, नगरपालिका, समाजकल्याण कार्यालय तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील इतर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामानिमित्त नागरिक, सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचे पदाधिकारी नियमितपणे येत असतात. मात्र अनेक वेळा संबंधित टेबलचे जबाबदार कर्मचारी तसेच अधिकारी कार्यालयात आढळून येत नाहीत. अनेक ठिकाणी कर्मचारी कोणत्या पदावर कार्यरत आहेत, याची माहिती देणारे आयडी कार्ड, नावफलक किंवा पदाची पाटी टेबलवर लावलेली नसल्याने नागरिकांची अधिकच दिशाभूल होते.
काही कार्यालयांमध्ये लंच टाईमच्या नावाखाली एक ते दोन तास कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी देखील वारंवार समोर येत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे काम रखडते, वेळ व पैसा वाया जातो आणि प्रशासनाबाबत नकारात्मक भावना निर्माण होत आहे.