अध्यक्षपदी संजय इंगळे तिगावकर – उपाध्यक्ष दीपक गुढेकर, भारती गोमासे
वर्धा: निसर्ग संरक्षण, संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात कार्यरत बहार नेचर फाउंडेशन या संस्थेच्या नव्या कार्यकारिणीची निवड वार्षिक आमसभेत करण्यात आली. या सभेत बहारच्या अध्यक्षपदी वन्यजीव अभ्यासक व साहित्यिक संजय इंगळे तिगावकर तर उपाध्यक्षपदी पक्षीमित्र दीपक गुढेकर व भारती गोमासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बहारचे पूर्वाध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या वार्षिक आमसभेत आगामी पाच वर्षांकरिता नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. या नवनियुक्त कार्यकारिणीत सचिवपदी युवा वैज्ञानिक दर्शन दुधाने, सहसचिव देवर्षी बोबडे, कोषाध्यक्ष आकाश जयसवाल तसेच कार्यकारी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे व डॉ. बाबाजी घेवडे यांच्यासह कीटकशास्त्रज्ञ अतुल शर्मा, जीवशास्त्रज्ञ पल्लवी बोदिले, निवास उरकुडे, याकुब शेख व शांतनू बोरवार यांचा समावेश आहे. या वार्षिक आमसभेला जयंत सबाने, राजदीप राठौर, डॉ. आरती प्रांजळेघुसे, घनश्याम माहुरे, ॲड. पवन दरणे, आशा घेवडे, संगीता इंगळे, चित्रा इंगळे, सारिका डेहनकर, अमोल मुनेश्वर, मोनिका जयसवाल, मनेशकुमार सज्जन, लोहित हजारे, मोहन हांडे, अमेय ठाकरे, प्रमोद इंगोले यांच्यासह बहारचे सदस्य उपस्थित होते.
बहारची बहारदार वाटचाल
गत अकरा वर्षात बहार नेचर फाउंडेशनने विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले असून पवनार येथे यवतमाळ नागपूर मार्गावर लावण्यात आलेली नील्पंख या शहरपक्ष्याची भव्य प्रतिकृती ही बहारचीच देण होय. बहार व नगर परिषद आयोजित या आगळ्यावेगळ्या वर्धा शहरपक्षी निवडणुकीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. सेवाग्राम येथे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाच्या आयोजनासह शेतकरी पक्षीमित्र संमेलन, विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन, जिल्हा पक्षी सूची प्रकाशन, जलसाठ्यांची स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन, लांब पल्ल्याच्या सायकल परिक्रमा, अभ्यास सहल, जंगल वाचन, प्राचीन वास्तू व वारसा स्थळांबाबत जनजागृती, जैवविविधता नोंदी, जीवाश्म, वृक्ष, पक्षी, फुलपाखरे, साप आणि विविध प्रकारच्या वन्यजीवांबाबत संरक्षण, संवर्धन व संशोधन कार्य, सातत्यपूर्वक पक्षीनिरीक्षण, आकाश निरीक्षण, खगोलीय घटनांबाबत मांडणी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निसर्ग जागर, विज्ञान व्याख्यानमाला, कार्यशाळा, पर्यावरणीय घटकांची ओळख करून देणारे ऑनलाइन परिसंवाद, अशा वैविध्यपूर्ण कार्यामुळे बहारने अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त केला आहे.
राज्य सरकारने शासकीय स्तरावर महाराष्ट्रात सुरू केलेल्या पक्षीसप्ताहाचे श्रेयही बहार नेचर फाउंडेशनला प्राप्त होते. बहारच्या अभिनव उपक्रमांची दखल संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही घेण्यात आली आहे. हीच परंपरा आगामी काळातही जोपासली जाणार असल्याचा विश्वास यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीद्वारे व्यक्त करण्यात आला.