वर्धा : वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याने शैलेश अग्रवाल यांच्या विरोधात वर्ध्यात काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. काँग्रेसच्या वतीने सद्भावना भवनपुढे शैलेश अग्रवाल यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शैलेश अग्रवाल यांनी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याचा विरोध दर्शविण्यात आला.
वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, अग्रवाल यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली. अग्रवाल यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. काँग्रेसच्या गोटात यास जोरदार विरोध दर्शविल्या जाऊ लागला. शैलेश अग्रवाल यांच्या विरोध दर्शवत जिल्हा कार्यालयापुढे शैलेश अग्रवाल यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शैलेश अग्रवाल यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, विजय नरांजे, बाळा माऊसकर, नरेंद्र मसराम, उदय मेघे, राजेंद्र शर्मा, इकराम हुसेन, बाळा जगताप, राहुल सुरकर, सादिक शेख, सोनाली कोपुलवार, सपना शेंडे, रुतुजा भोयर, प्रफुल्ल नाखले आदींची उपस्थिती होती.
निलंबित करण्यापेक्षा निष्कासित करायला पाहिजे होतं. पत्र म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा यापेक्षा जास्त काहीच नाही. मी निलंबन माघारी घेण्याची विनंती स्वपक्षाची मतं आपल्या उमेदवाराला मिळवून देण्याऐवजी विरोधकांना विकणाऱ्या या निर्लज्ज लोकांपुढे करणार नाही. पक्षत्याग करत असल्याचे जाहीर करतो, असे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले.
वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतर काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचे काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कमिटीने पत्र काढत ही कारवाई केली. उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी शैलेश अग्रवाल यांना निष्कासित करण्याच्या कारवाईची मागणी केली होती.