प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे वर्धा : वर्धा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या आर्वी-वर्धा मार्गावर तळेगाव रघूजी गावाजवळ आज दि. १९ सप्टेंबर चे सकाळी ५:३० वाजताच्या सुमारास एका भरधाव आयशर वाहनाने समोरुन येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डंपरचा चालक आणि ट्रॅक्टरवरील चालक असे दोन जण जागीच ठार झाले असून, आयशरमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार, फिर्यादी गजानन विठ्ठलराव नांदने (वय ३५ वर्षे, रा. खंबीत, ता. आष्टी, जि. वर्धा) आणि त्यांचे सहकारी राजकुमार भिमराव नचाने (वय २६ वर्षे, रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती) हे दोघेजण परतवाडा येथून डंपर (क्र. एमएच २७ डीटी ९७४८) घेऊन तिवसा मार्गे आर्वी येथे आले होते. आर्वीवरून पुढे पवनी (जि. भंडारा) येथे वाहन घेऊन जात असताना, वर्धा मार्गावरून जात असताना तळेगाव रघूजी गावाजवळ सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
डंपर वर्धा रोडने जात असताना, त्याच्या विरुद्ध दिशेने खरांगणा कडून दोन नवीन मुंडके असलेले बिना नंबरचे ट्रॅक्टर येत होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या आयशर वाहनाच्या क्र. एमपी ०४ वाय के ४७९३ चे चालक गुल्लूभाई हसन, रा. मध्य प्रदेश अतिशय भरधाव वेगात, हलगर्जीपणाने व निष्काळजीपणे आपले वाहन चालवून समोरून येत असलेल्या डंपरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आयशर वाहन पलटी होऊन त्या दोन्ही ट्रॅक्टरवर जाऊन आदळले.
अपघातातील जीवित व वाहन नुकसान तपशील:मृत व्यक्ती १: यात राजकुमार भिमराव नचाने,वय २६, रा. हिवरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती— डंपर चालक. व शशिकांत जनार्दन सावरकर (वय ४०, रा. वडगाव (कला), ता. सेलु, जि. वर्धा ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अजनील हसन गुल्लू हसन आयशरमधील व्यक्ती हा गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
डंपर क्र. एमएच २७ डीटी ९७४८ व आयशर वाहन क्र. एमपी ०४ वाय के ४७९३ ? दोन विना नंबरचे ट्रॅक्टर चेसिस नं. प्लझ-१७९१४५३ व किए-१८१७१६०५३ हे क्षतिग्रस्त झाले असून यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघातामध्ये दोन्ही चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आयशरमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
याप्रकरणी फिर्यादी डंपर चालक गजानन विठ्ठलराव नांदने यांच्या तक्रारीवरून, आयशर वाहनाचा चालक गुल्लूभाई हसन (रा. मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध भरधाव वेगात, हलगर्जीपणे व निष्काळजीपणे वाहन चालवून दोन निष्पाप व्यक्तींच्या मृत्यूस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस स्टेशन खरांगणा येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.