समुद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई : खत चोरी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद, ६.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : समुद्रपूर पोलिसांनी खत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६ लाख ९६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

समुद्रपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४०३/२६, कलम ३०३(२) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी गजानन रामकृष्ण ढोकपांडे (वय ४४, रा. शेडगाव, ता. समुद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १७ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान मौजा दहेगाव शेतशिवार येथून अज्ञात चोरट्यांनी शेतात ठेवलेल्या रासायनिक खतांच्या ६० बॅग तसेच शेजारील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील १८ बॅग अशा एकूण ७८ बॅग चोरी करून नेल्या होत्या. चोरीस गेलेल्या खताची किंमत ९६ हजार ४६० रुपये इतकी होती.

घटनेची गंभीर दखल घेत समुद्रपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अज्ञात आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान स्वप्निल अंकुश महाजन (वय २७, रा. समुद्रपूर), अनिल मारुती मांडवकर (वय ३६, रा. दहेगाव) आणि पुंडलिक विठ्ठल उरकांदे (वय ४०, रा. दहेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून चोरीस गेलेले ७८ पोते रासायनिक खत, किंमत ९६ हजार ४६० रुपये, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर (किंमत ५ लाख रुपये) आणि ट्रॉली (किंमत १ लाख रुपये) असा एकूण ६ लाख ९६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वानखेडे, पोलीस हवालदार वीरेंद्र मस्के, प्रकाश मैद, कपिल मेश्राम, संजय वानखेडे व रामू पंधरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *