दै. प्रतापगडचे वारे / अभय बेदमोहतासेलू : स्थानिक प्रभाग क्रमांक १६ मधील ‘नमो उद्याना’च्या कामावरून सध्या सेलू नगरपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथे सुरू असलेल्या कामांमधील अनियमिततेची चर्चा होत असतानाच, आता एका नवीन निविदेच्या नाट्यमय रद्दबातल प्रक्रियेमुळे नगरपंचायतीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रभाग १६ मध्ये सध्या एक कोटी रुपयांचे ‘नमो उद्याना’चे काम सुरू असून, त्याचे कंत्राट वैभव वाघमारे यांनी १९ टक्के ‘बिलो’ (कमी दराने) निविदा भरून मिळवले आहे. या कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाची शहरात मोठी ‘ख्याती’ आहे. दरम्यान, याच उद्यानात बोअरवेल आणि फॅन्सिंगच्या वाढीव कामासाठी ७ लाख ८५ हजार ४४० रुपयांची नवीन निविदा १८ जून २०२६ रोजी काढण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार, २४ जूनपर्यंत निविदा भरण्याची मुदत देण्यात आली होती.
सकाळी निविदा प्रसिद्ध झाली आणि सर्व प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच, अचानक त्याच दिवशी संध्याकाळी तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांचा आडोसा घेत ही निविदा रद्द करण्यात आल्याचे शुध्दीपत्रक काढण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘निविदा प्रक्रियेत असे काय ‘काळे मांजर’ आडवे गेले की एका दिवसात निविदा रद्द करावी लागली?’ असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नमो उद्यानात आधीपासूनच एक बोअरवेल अस्तित्वात आहे, जी दुरुस्त केल्यास चालू शकते. तसेच, उद्यानाला नवीन फॅन्सिंग करण्याऐवजी जुन्या भिंतीची डागडुजी करणे शक्य होते. असे असतानाही केवळ कमिशन लाटण्यासाठी ही अनावश्यक निविदा काढल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नगरसेवकांपैकी काही जागरूक सदस्यांनी या प्रकरणातील ‘डाव’ ओळखल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि निविदा रद्द करावी लागली, अन्यथा काही मोजक्या लोकप्रतिनिधी व कंत्राटदारांचे खिसे सरकारी पैशातून लबलब भरले असते, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
येथील कारभारावर भाष्य करताना नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ‘येथील नगरपंचायतीचा कारभार म्हणजे ‘आंधळा दळतो आणि कुत्रा पीठ खातो’ या म्हणीसारखा झाला आहे,’ अशा शब्दांत नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.