मोबाईल वादाचे रूपांतर खुनात; सेलू हादरले पोलिसांचा तपास वेगात

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,सेलू : किरकोळ मोबाईल हिसकावण्याच्या वादाने थेट खुनाचे स्वरूप धारण केल्याने सेलू परिसरात खळबळ उडाली आहे. बेलगावचा रहिवासी प्रवीण योगीराज राऊत (वय २०) हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली होती.

१० एप्रिल रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संशयित सूरज रमेश ढगे याला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकातील अंमलदार अखिलेश गव्हाणे, मनोहर मुडे, सचिन वाटखेडे, विनायक गोडै यांनी कारवाई केली. फॉरेन्सिकची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतम निमगडे करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल हिसकावण्याच्या वादातून आरोपीने दगडाने हल्ला करत प्रवीणचा खून केला असावा असे कयास लागत आहे. पुरावे लपवण्यासाठी मृतदेह विश्रामगृहाच्या मागील डोहात फेकण्यात आला. या गुन्ह्यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *