नागरिकांच्या आरोग्याशी खेळ !
दै. प्रतापगडचे वारे / अभय बेदमोहता,सेलू : शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये सध्या पाणीपुरवठ्याबाबत एक धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. येथील नळयोजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात शुद्ध पाणी मिळण्याऐवजी चक्क ‘रक्तमिश्रित लाल रंगाचे’ पाणी व कोंबडीचा बुरा सुद्धा नळातून येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून, प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे आरोप स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याबाबत प्रभागाचे नगरसेवक संदीप सांगोळकर यांचेशी प्रथमत: संपर्क साधला असता आपली जबाबदारी झटकत त्यांचे सपाट उत्तर होते की तुमचे पाणी पाहण्यासाठी मी नागपुरहून येऊ काय?
प्रभाग १६ मधील रहिवासी राहुल बिसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याचा रंग हळूहळू आज पूर्णपणे बदलला आहे. नळाला पाणी आल्यानंतर ते अत्यंत लालसर आणि रक्तमिश्रित असल्याचे दिसून येत आहे. या पाण्याला उग्र वास येत असल्याने ते पिण्यायोग्य तर सोडा, वापरण्यायोग्य राहिले नाही. पिण्याच्या पाण्याचा हा असा भयानक प्रकार पाहून नागरिक भयभीत झाले आहेत.
सदर स्थिती स्वतः नगरपंचायतच्या आलेल्या लोकांच्या निदर्शनास सुद्धा आले. या दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि काविळीसारखे गंभीर जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज अधिक आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाचा हा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. प्रभाग १६ मधील अनेक नागरिक सध्या पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वणवण भटकत आहेत.
नगरपालिका प्रशासनाचे या भागातील जलवाहिनीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. पाइपलाइनमध्ये गळती होऊन सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीमध्ये मिसळत असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपंचायत प्रशासनाने या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने नळयोजनेच्या पाइपलाइनची तपासणी करून पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राहुल बिसेनसह परिसरातील अनेक नागरिकांनी केली आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तेथील नागरिकांनी दिला आहे.