शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणी करू नये

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे आवाहन

पेरणीसाठी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस आवश्यक

वर्धा : भारतीय हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार २० जून पर्यंत मान्सून विदर्भात दाखल होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पाऊस सरासरीच्या ९२ टक्के म्हणजेच नेहमीपेक्षा कमी राहण्याचा आणि पावसाचा मोठा खंड पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी केवळ सुरुवातीच्या हलक्या पावसावर घाईघाईने पेरणी करू नये, जोपर्यंत शेतात सलग व चांगला ८० ते १०० मिमी प्रभावी पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी टाळावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अपुऱ्या ओलाव्यामध्ये पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. याकरिता कृषी विज्ञान केंद्राने वर्तवलेल्या तांत्रिक शिफारशींचा आधार घेऊनच शेतकऱ्यांनी या हंगामात पीक व पेरणीचे नियोजन करावे. पावसाच्या लहरीपणामुळे पेरणीस उशीर झाल्यास पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

सोयाबीन : सोयाबीन पेरणीसाठी २५ जून ते ८ जुलै हा कालावधी सर्वाधिक योग्य व शिफारसीत आहे. जर पेरणी ९ जुलै ते २२ जुलै या काळात लांबली तर सोयाबीनच्या उत्पादनात ३६ टक्क्यांपर्यंत मोठी घट येऊ शकते. २५ जुलैनंतर सोयाबीनची पेरणी पूर्णपणे टाळावी.

कापूस : कापूस पेरणी १० जुलैपर्यंत आटोपून घ्यावी. पेरणी १५ जुलैपर्यंत लांबल्यास कापसाच्या उत्पादनात २४ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असते. मध्यम ते हलक्या जमिनीत कापसासाठी अति सघन लागवड पद्धतीचा (९०x१५ सें.मी.) अवलंब करावा. कमी पाऊस आणि कोरड्या हवामानात तग धरू शकतील अशा कमी कालावधीच्या सुधारित वाणांची निवड करावी. त्यात साधारणपणे सोयाबीनचे पीडीकेव्ही अंबा, सुवर्ण सोया हे वाण तर तूर पिकाचे पीडीकेव्ही आश्वलेषा, बीडीएन-७१६, बीडीएन-७११ वाण उपयुक्त आहे.

हवामान अनुकूल आंतरपीक पद्धती : उत्पादनाची जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सलग पेरणीऐवजी आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. यामध्ये सोयाबीन अधिक तूर (४:२), कपाशी अधिक सोयाबीन/उडीद/मूग (१:१), ज्वारी अधिक तूर (३:३ किंवा ४:२) किंवा कापूस अधिक तूर (६:१ किंवा ८:१) या पद्धतीचा प्रामुख्याने अवलंब करावा.

ओलावा संवर्धन आणि ताण व्यवस्थापन : पेरणीसाठी अनिवार्यपणे बीबीएफ यंत्राचा वापर करावा. यामुळे अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा होतो आणि पावसाचा खंड पडल्यास जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. यंत्र उपलब्ध नसल्यास ६:१ पद्धत वापरावी. कापूसवर तूर पिकात वखराच्या साहाय्याने वेळोवेळी हलकी डवरणी करावी, जेणेकरून जमिनीतील भेगा बुजून पाण्याचे बाष्पीभवन रोखता येईल.

ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यास पिकाचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट १५० ते २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा १९:१९:१९ (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या विद्राव्य खतांची फवारणी करावी. तसेच नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर करावा.

बीजप्रक्रिया अत्यंत अनिवार्य : पेरणीपूर्वी बियाणाला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्यानंतर रायझोबियम व पीएसबी या जैविक खतांची क्रमाने बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पिकाची सुरुवातीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो. हवामान, कीड नियंत्रण आणि तांत्रिक सल्ल्यासाठी कृषी विभागाच्या महाविस्तार ॲपचा वापर करावा. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *