गॅस टंचाईच्या भीतीने ग्रामीण जीवन पुन्हा पारंपरिक मार्गावर

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे:वर्धा : जागतिक राजकारणात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेला तणाव आणि युद्धाच्या ढगांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद आता थेट खेडोपाडी उमटू लागले असून, गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या धास्तीने ग्रामीण जीवन पुन्हा एकदा ‘पारंपरिक’ वळणावर परतताना दिसत आहे.

जागतिक राजकारणात अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे युद्धाचे ढग दाटू लागल्याने त्याचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटताना दिसत आहेत. संभाव्य युद्धस्थितीमुळे गॅस, पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पुन्हा पारंपरिक पद्धतींकडे वळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गावातील काही कुटुंबांनी स्वयंपाकासाठी गॅसऐवजी चुलीचा वापर सुरू केला असून, लाकूड-फाटा साठवण्याकडेही कल वाढला आहे. शेतकरीवर्गही ट्रॅक्टरचा वापर कमी करून पारंपरिक शेती पद्धतींचा विचार करू लागला आहे.

वाहनधारकांनी पेट्रोल-डिझेलची बचत करण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्माण झालेली ही भीती ग्रामीण जीवनशैलीवर परिणामकारक ठरत आहे. पेट्रोलपंपांवर गर्दी, सायकली अडगळीतून बाहेर मागील आठवडाभरापासून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार, अशी अफवा वाऱ्यासारखी पसरली आहे. यामुळे समुद्रपूर तालुक्यातील परिसरातील पेट्रोलपंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे, ज्या सायकली गेल्या काही वर्षांत अडगळीत फेकल्या गेल्या होत्या, त्या आता पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. शेताकडे जाण्यासाठी किंवा जवळच्या अंतरावर फिरण्यासाठी तरुण आणि ज्येष्ठ नागरिक दुचाकीऐवजी सायकलींना पसंती देत आहेत.

गॅस टंचाईमुळे पुन्हा चुली पेटल्या केवळ इंधनच नव्हे, तर स्वयंपाकाच्या गॅसचाही तुटवडा भासणार असल्याच्या चर्चेने ग्रामीण भागातील गृहिणींनी सावध पवित्रा घेतला आहे. अनेक घरांच्या अंगणात पुन्हा सरपणाच्या मोळ्या दिसू लागल्या असून, चूल पेटू लागली आहे. केवळ चहापाण्यापुरता गॅस वापरून, जेवणासाठी चुलीचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे काळाच्या ओघात लुप्त होत चाललेली ‘चूल’ पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *