शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपुरात आमदार रोहित पवार यांचे अनशन आंदोलन

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतुल वांदिले आंदोलनात झाले सहभागी

वर्धा: राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अनशन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री सुनील केदार, युवा नेते सलील देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे उपस्थित होते तसेच राज्यभरातील शेतकरी, सामाजिक संस्था आंदोलनाला पाठिंबा देत असून विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्यातील वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, अशा परिस्थितीत सरसकट कर्जमाफी हा एकमेव दिलासा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या अनशन आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा वाढत असून, विविध जिल्ह्यांतील शेतकरी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते पंढरपूर येथे दाखल होत आहेत. वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या सहभागामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्येही आंदोलनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *