एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत आरोग्य, पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण बाबी पुरविण्यात येतात. अंगणवाडी शिक्षणाचा मूळ आधार असल्याने अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात येत आहे. या केंद्रामधून मुलांना आल्हाददायक वातावरणासोबत आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. त्यासाठी अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यात येत आहे. अंगणवाडी मध्ये स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लहान बालकांचा सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षण, आरोग्य, पोषण या तिन्ही क्षेत्रांचा दर्जा उंचावण्यासाठी किटचा उपयोग होणार आहे.
यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी एक लाख ६४ हजार ५६० रुपयांना निधी मंजूर करण्यात आला आहे. किट खरेदीसाठी ८९ कोटी १९ लक्ष ७८ हजार ५६० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील देखील १०६ अंगणवाडीला ही स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आहे. किटमध्ये ही साधने उपलब्ध राहणार स्मार्ट अंगणवाडी किट मध्ये स्मार्ट टॉकी, शिक्षण अनुकूल खेळणी, बालविकासासाठी आवश्यक साधन सामुग्री, ऑडिओ व्हिज्युअल साधने, वजन काटे व मापन साधने, स्वच्छता साहित्य, आरोग्य तपासणी उपकरणे, स्वच्छ पिण्याचे पाणी, सुरक्षित साठवण क्षमता आदिका समावेश आहे.
प्रकल्पाचा उद्देश ग्रामीण भागातील बालकांना शहराप्रमाणे दर्जेदार शिक्षण आणि पोषण सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. अंगणवाड्यांमध्ये बालशिक्षणाचे वातावरण अधिक रंगदार आणि आकर्षक बनविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच, शिक्षिका व सहायकांना आधुनिक उपकरणांच्या वापराबाबत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.