वर्धा : गांजा अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेत गांजासह मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली आहे. ११ जानेवारी रोजी रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत गस्त करत होते.
त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महात्मा फुले वॉर्ड हिंगणघाट येथे शैलेंद्र उर्फ डोमा सुरेश बालदे याच्या घरी छापा टाकण्यात आला. तेथे तो हजर मिळून आला. झडती घेतली असता, एका प्लास्टिक पिशवीतील पन्नीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळून आला. सदर गांजा त्याने त्याच्याजवळील एम.एच. ३२ ए.झेड. ८३५२ क्रमांकाच्या दुचाकीने एका इसमाकडून खरेदी केल्याचे सांगितले.
आरोपीच्या ताब्यातून ७२१ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, वाहतुकीकरीता वापरलेल्या दुचाकीसह १ लाख १४ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली.