पालकमंत्री पंकज भोयर यांची भाजपच्या वतीने पत्रकार परिषद
वर्धा: वर्ध्यात भाजप कार्यालयात मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार दादाराव केचे, माजी जिल्हाध्यक्ष सुमी गफाट, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, अशोक कलोडे आदींची उपस्थिती होती. पर्यावरण संरक्षण आणि विकास यांचा समतोल राखत भारताने नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत जागतिक स्तरावर तिसरे स्थान प्राप्त केले आहे. जीवाश्म इंधनविरहित स्रोतांतून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी साध्य करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाखाली केंद्र सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या १२ वर्षांच्या कालखंडात ‘राष्ट्र प्रथम आणि विकसित भारत’ या ध्येयाने प्रेरित होऊन भारताने विकास, सुशासन, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण, डिजिटल परिवर्तन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ऐतिहासिक झेप घेतली आहे.
२०१४ ते २०२६ या कालखंडात भारताने जगासमोर एक नवा आत्मविश्वास, नवी अर्थव्यवस्था आणि नवा भारत उभा केला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा मंत्र केवळ घोषवाक्य न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्यक्ष विकासकामांच्या स्वरूपात साकार झाला आहे, असे पालकमंत्री पंकज भोयर म्हणाले.
विकास तसेच वारसा या मंत्रानुसार भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ धाम, महाकाल लोक आणि केदारनाथ धाम पुनर्बांधणीसारखे प्रकल्प भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक ठरले आहेत. मोदी सरकारची ही १२ वर्षे विश्वास, विकास आणि जनकल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली आहेत. देशातील गरीब शेतकरी, महिला, युवा आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या निर्णयामुळे भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि विकसित भारत २०४७ च्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आजचा भारत आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे ही काळाची गरज आहे, असेही पालकमंत्री भोयर म्हणाले.
शेतकऱ्यांना लवकर लवकर २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळाली पाहिजे, याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देताना त्यांचा तालुकास्तरावर सन्मान व्हावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
एफडीएच्या कारवाईने गोरस भंडारचे दुध संकलन केंद्र बंद झाले आहे. ६०० ते ७०० गोपालक दुध देतात. एफडीएला शेतकऱ्यांचे दुध परत जाणार नाही, अशा दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी डेअरी विभागाशी संपर्क साधला. डेअरी विभागाने दुध घेऊ सांगितले. गोरस भंडारमध्ये जेवढा दर शेतकऱ्यांना मिळत होता तेवढा दर डेअरी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मिळत नाही. हा फरक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी प्रयत्न करत आहे. गोरस भंडारबाबत तातडीने हेअरिंग घेण्याबाबत निर्देश द्यावे, संस्था पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे पालकमंत्री भोयर यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर दुध संकलन केंद्र आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावर दुध संकलन केंद्र आहे. आपल्याकडे सहकार चळवळ मजबूत नाही आहे, ज्यांच्या हातात सहकार चळवळ यापूर्वी होती, त्यांनी सहकार चळवळीचे बारा वाजविण्याचे काम या जिल्ह्यातील सहकार महर्षींनी केल्याची टीका पालकमंत्री भोयर यांनी केली.