शून्य ते पाच वर्षाखाली बालके लसीकरणा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या : अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली

जिल्ह्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

जिल्हा टास्कफोर्स समिती सभा

वर्धा: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दिनांक २८ जून रोजी ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी समन्वय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभाक्षमध्ये आज पोलिओ लसीकरण नियोजनाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, इंडियन मेडिकल असोशिएन अध्यक्ष डॉ. प्रदिप सुने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

शून्य ते पाच वर्षाखालील बालके लसीकरणा पासून वंचित राहणार नाही दक्षता घेऊन आरोग्य विभागांनी इतर विभागाच्या समन्वयातून कामे करावी लसीकरण मात्रा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध करून वेळेपूर्वी लसीकरण केंद्रावर पोहोचेल याचे नियोजन करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिल्या.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७० हजार ५८५ तर शहरी भागातील २५ हजार ६४८ अशा एकूण ९६ हजार २३३ शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार असून यासाठी १ हजार ३८९ लसीकरण केंद्र कार्यरत असणार आहेत. ग्रामीण भागामध्ये १ हजार १३०० तर शहरी भागामध्ये २५९ बूथ असणार आहे. यासाठी ३ हजार ३२४ आरोग्य विभागाचे कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा, स्वयंसेवक यांची मदत घेण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २७० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. २८ जून रोजी जे बालक काही कारणास्तव लसीकरणापासून वंचित राहिले आहे. अशा बालकासाठी ग्रामीण भागामध्ये दिनांक २८ ते ३० जून व शहरी भागामध्ये २८ जून ते २ जुलै दरम्यान आयपीआय अंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

यावेळी बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी, टास्कफोर्स समितीचे सदस्य, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित होते.

या ठिकाणी मिळणार पोलिओ लस
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, घराजवळील बूथ, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, मोबाईल व्हॅन बूथ आदी भागांमध्ये लसीकरण उपलब्ध असेल. या लसीकरण मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *