वर्धा : वेळेवर निदान, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील २८ वर्षीय जयश्री कदम यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय (एव्हीबीआरएच), सावंगी (मेघे), वर्धा येथे त्यांच्या मेंदूतील दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
सौ. जयश्री कदम यांना गेल्या काही महिन्यांपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. त्याचबरोबर त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत होती आणि डाव्या डोळ्याला सूजही आली होती. हिमायतनगर येथे आमदार बाबूराव कदम कोहळीकर व एव्हीबीआरएच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारोग्य शिबिरात त्यांनी तपासणी करून घेतली. शिबिरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृतीची गंभीरता ओळखून त्यांना पुढील तपासणी व उपचारांसाठी तातडीने एव्हीबीआरएच, वर्धा येथे पाठविले.
एव्हीबीआरएचच्या न्युरोसर्जरी विभागात करण्यात आलेल्या सविस्तर तपासणीत त्यांच्या मेंदूत डोळ्यापर्यंत पसरलेली दुर्मिळ प्रकारची गाठ (स्फेनॉइड बिंग मेनिंजिओमा विथ ऑर्बिटल एक्सटेन्शन) असल्याचे निदान झाले. त्यांना ११ मे २०२६ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम-जेबाय) अंतर्गत नोंदणी करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. २१ मे २०२६ रोजी तज्ज्ञ न्युरोसर्जनांच्या पथकाने मेंदूतील गाठ काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णाची दृष्टी व डोळा सुरक्षित ठेवण्यात यश आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती समाधानकारक असून त्या जलदगतीने बऱ्या होत आहेत.
एव्हीबीआरएचच्या सामुदायिक सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. अभिषेक जोशी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील गंभीर व दुर्लक्षित आजारांचे वेळेवर निदान करण्यासाठी महारोग्य शिबिरे अत्यंत प्रभावी ठरत आहेत. या माध्यमातून रुग्णांना प्रगत व सुपरस्पेशालिटी उपचार सहज उपलब्ध होत आहेत. (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल यांनी ‘प्रत्येक गरजूपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे’ हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. दुर्गम व वंचित भागांमध्ये विविध सामुदायिक आरोग्य उपक्रमांद्वारे अत्याधुनिक आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत असून महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या यशस्वी उपचारांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणाऱ्या, सहज उपलब्ध आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याच्या एव्हीबीआरएचच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.