देशी बनावटीचे अग्निशस्त्र, जिवंत काडतुस जप्त

प्रतिनिधी / दै. प्रतापगड़चे वारेवर्धा – वर्ध्यात देशी बनावटीचे अग्निशस्त्र, जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. पोलिसांनी ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभाग वर्धा परिसरात अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणीसाठी गस्त करत होते. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल बंजागे रा. धंतोली वर्धा हा इतवारा पोलीस चौकी समोर, वर्धा येथे त्यांच्याजवळ अवैधरीत्या देशी बनावटीचे अग्निशस्त्र बाळगून दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात असल्याची माहिती मिळाली. पथक पोलीस चौकीसमोर गेले असता अमोल यशवंत बंजागे (वय ३१) हा पोलिसांना पाहून पळून जात होता. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत होता. तपासणी केली असता देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅगझिनसह मिळून आले.

मॅगझीन काढून पाहणी केली असता त्यामध्ये एक जिवंत काडतुस दिसले. अग्निशस्त्र बाळगण्याबाबत पासपरवाना विचारले असता त्याने त्याचे जवळ कोणताही पासपरवाना नसल्याचे संगीतले. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे अग्निशस्त्र मॅगझिनसह, एक जिवंत काडतुस, मोबाईल, एम.एच. ३२ एल ४६५६ क्रमांकाची दुचाकी आदी ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल हटेकर, पोलीस अंमलदार अमर लाखे, अमरदीप पाटील, चंद्रकांत गते, धर्मेंद्र अटकाळी, पवन पात्रस, रितेश कुन्हाडकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *