गो संवर्धन गोरस भंडारवर प्रशासक नियुक्त करा

महेश तेलरांधे यांची पत्रकार परिषदेतील मागणी

वर्धा : तहसील भो दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या., वर्धा (गो संवर्धन गोरस भंडार), ता. जि. वर्धा या संघाचे कामकाज बेकायदेशीर असून त्याबाबत तक्रारी नंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली असता त्यांनी चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले. या संदर्भात काही महिन्यांपूर्वी मुंबई व नाशिक येथील अधिकारी येऊन त्यांनी लेखापरीक्षण केले. लेखापरीक्षण अहवाल दिनांक १८-०७-२०२४ असून त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या संस्थेवर प्रशासक नियुक्त करा, अशी मागणी गोरस भंडार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष महेश तेलरांधे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

संघाचा आर्थिक घोटाळा संघ तोट्यात आहे. याचे कारण सध्याचे व्यवस्थापक व संचालक मंडळ असल्याचे दिसून येते. संघाच्या व्यवस्थापकांकडे व्यावसायिक कौशल्य व नियोजनाचा अभाव आहे. संघाकडे पुरेसे आधुनिक साहित्य नाही. आर्थिक नुकसानीस त्याचे संचालक मंडळ व व्यवस्थापक जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. संघाच्या एकूण व्यवहारांमध्ये रु. १,१३,७७,०८०/- इतके आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद असून, या आर्थिक व्यवहारास संघाचे माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, संघाचे आताचे अध्यक्ष, सध्याचे संचालक मंडळ व व्यवस्थापक जबाबदार असून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद आहे.

नियमबाह्य व्यवस्थापक नियुक्ती त्याचे सध्याचे व्यवस्थापक श्री म. न. कडू यांची शैक्षणिक अर्हता (किंबहुना ते दहावी पासही नाहीत) व वयोमानाची स्थिती संघाच्या सेवा नियमांप्रमाणे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नौकरभरती घोटाळा संघाच्या चाचणी लेखापरीक्षणातील मु.दा क्र. ४, ५ व ८ नुसार तपासणी केली असता संघाचे अध्यक्ष, संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी केलेली नोकरभरती विहित पद्धतीने केलेली नाही. तसेच ही नोकरभरती संघाला आर्थिक अडचणीत आणणारी असून संघाचा प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संघाचे बहुतांश उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत असल्याने संघ आर्थिक अडचणीत आलेला आहे. या बाबत चाचणी लेखापरीक्षणातील शेरा विचारात घेऊन कार्यवाही होणे आवश्यक आहे. अन्यथा संघ नजीकच्या काळात अधिक गंभीर आर्थिक अडचणीत जाऊ शकतो.

आर्थिक नियमांचे उल्लंघन चाचणी लेखापरीक्षण कालावधीतील आर्थिक पत्रके तपासली असता, दिनांक ३१/०३/२०२३ अखेरच्या आर्थिक पत्रकानुसार संघनियम ३५ मध्ये नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा संघाने अधिकची जबाबदारी उचलून नियमांचे उल्लंघन केलेले असल्याचे दिसून आले आहे. लाकूड खरेदी व कच्चा माल खरेदी घोटाळा सध्या लाकूड खरेदी, किराणा खरेदी व वैरण डेप खरेदी यांसारख्या खरेदी करताना संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेता जात नाही. तसेच यासाठी उपसमितीची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. या खरेदीवरील खर्चास संचालक मंडळाची मंजुरी घेतली जात नसल्याचे दिसून आले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. आर्थिक पत्रके तयार करण्यात अनियमितता. संघाची आर्थिक पत्रके तयार करताना नियम व कायदेशीर तरतुदीनुसार विहित कालावधीत तयार करून त्यास संचालक मंडळाची मंजुरी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे.

तूप व बेकरी साहित्य साठवणुकीबाबत गंभीर बाब संघाची तूप व बेकरी साहित्य साठवणुकीची जागा अत्यंत अस्वच्छ, अपुरी व अनारोग्य वाढवणारी असल्याचे मला आढळून आले. याबाबत संघाने त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात संघाच्या व्यावसायिक उपक्रमास धोका निर्माण होऊ शकतो.संघाचे संपूर्ण पैसे व उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत आहे.

संघाचा वर्ग-४ कर्मचारी वर्षाला साधारण १ लाख रुपये कमवत असताना, ज्या संघाच्या कायदेशीर अस्तित्वामुळे सभासद, संचालक मंडळ, व्यवस्थापक, व्यापारी व पुरवठादार मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उलाढाल व वेतन घेतात, त्या संघात एका कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनाइतकेही नफा प्राप्त होत नाही. त्यामुळे संघाशी संबंधित इतरांचा विकास होत असताना संघाचा स्वतःचा आर्थिक विकास होत नसून संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना दिसून येत नाही. असा आरोपही त्यांनी केला.

जबाबदार लोकांकडे भावनिक होऊन पाहणे योग्य नाही व तसे न केल्यास गांधींच्या नावावर भोंगल कारभार सुरूच राहील. शासनाला विनंती करतो की या लेखापरीक्षण अहवालावर त्वरित कार्यवाही करून संबंधित संचालक मंडळ, व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे व इ. अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी तसेच संघाचे माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, संघाचे आताचे अध्यक्ष, सध्याचे संचालक मंडळ व व्यवस्थापक जबाबदार असून त्यांच्याकडून रु. १,१३,७७,०८०/- ही रक्कम व्याजासह वसूल करावी.

अशी मागणी त्यांनी केली असून लेखापरीक्षण अहवालावर त्वरित कार्यवाही करून संबंधित संचालक मंडळ, व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचे इ. अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी तसेच संघाचे माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, संघाचे आताचे अध्यक्ष श्री निलेश वसंतराव पाटील सध्याचे संचालक मंडळ व व्यवस्थापक श्री माधवराव कडू जबाबदार असून त्यांच्याकडून १,१३,७७,०८०/- ही रक्कम व्याजासह वसूल करावी व तसे न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आपल्या माध्यमातून देत आहे निलेश वसंतराव पाटील श्री माधवराव कडू याच लोकांमुळे एवढ्या जुन्या संस्थेची आज जनतेमध्ये नाचक्की होत आहे. त्यामुळे यास जबाबदार असलेल्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *