रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण; बांधकाम विभाग मात्र गाढ झोपेत!
सेलु: काही दिवसांपूर्वीच ज्या रस्त्याला ‘महामार्ग’ म्हणून घोषित करण्यात आले आणि जो रस्ता हिंगणा ते हिंगणघाटसह थेट तुळजापूर रस्त्याला जोडला गेला, तोच रस्ता आता सामान्य जनतेसाठी आणि वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. किन्ही जवळील नायरा पेट्रोल पंपापासून ते घोराड पर्यंतचा नवनिर्मित मुख्य रस्ता जागोजागी खचला असून, रस्त्यावर मोठमोठे नाले आणि खड्डे पडले आहेत. या गंभीर समस्येकडे झोपाळलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, ‘प्रशासनाला जाग आणण्यासाठी आता कोणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहात का?’ असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ विचारत आहेत.
रस्ता ठिकठिकाणी खोलगट खचल्यामुळे आणि हायवेवर अचानक मोठे खड्डे येत असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे भीषण अपघात होत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पाठीचा, मणक्याचा आणि मानेचा तीव्र त्रास सुरू झाला असून, हा हायवे प्रवाशांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी याबाबत अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी व तोंडी कळविण्यात आले आहे. मात्र, अद्याप एकाही जबाबदार अधिकाऱ्याने या रस्त्याची पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे ‘बांधकाम विभागाचे अधिकारी जाणूनबुजून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत का?’ असा संशय नागरिकांमध्ये बळावला आहे.
नव्याने बांधलेल्या या रस्त्याची अल्पावधीतच झालेली दुरवस्था पाहता, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या साठ्यालोच्यामुळेच हा निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार झाल्याचा आरोप होत आहे. रस्त्यावरील हे जीवघेणे खड्डे आणि नाले तातडीने बुजवावेत, अशी मागणी हिंगणी आणि घोराड परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास हिंगणी व घोराड गावातील नागरिक लवकरच तीव्र आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
? करोडो रुपये खर्च करून हायवेचा दर्जा मिळालेला रस्ता जर सुरुवातीच्या काही दिवसांतच खचत असेल, तर या भ्रष्ट कारभाराला जबाबदार कोण? झोपी गेलेल्या बांधकाम विभागाने आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे आणि निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा होणाऱ्या आंदोलनाला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल!