देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकत नाही

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे देवळी : एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय झाला. हा विजय झाल्यानंतर काही लोक लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार, शेतकऱ्यांची मोफत वीज बंद करणार, सन्मान योजनाही बंद करणार, असे म्हणायला लागले. एक वर्ष पूर्ण झालं एकही योजना बंद केली नाही.

लाडक्या बहिणींचा एकही पैसा बंद केला नाही. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील ते कोणी बंद करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवळी येथील आठवडी बाजार येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. सभेला राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस, सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येराबार, आरपीआयचे विजय आगलाबे, माजी भाजपाध्यक्ष सुनील गफाट आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकारने शहरासाठी विविध योजना आणल्या. प्रत्येकाला घरासाठी आवास योजना आणली. जेथे नागरिक अतिक्रमण करून राहत होते त्यांना पट्टे देता येत नव्हते. पण आता पट्टे द्यायचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोणीही बेघर आणि बिना पट्ट्याचा राहणार नाही. सरकारकडे निधीची कमतरता नाही शहरासाठी पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करणार आहे.

पालिकेतील प्रशासक राज्य संपून जनतेचे राज्य येणार आहे. शहराकडे ५ दशक दुर्लक्ष झालं पण २०१४ ला मोदी सरकार आल्यापासून गावासह शहराचा योग्य नियोजन करून विकासाला सुरुवात झाली. जसा गावाचा विकास तसा शहराचा विकास संकल्प आहे. प्रदूषणच प्रश्न दूर करण्यासाठी आवश्यक गोष्टी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली. सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *