प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारेवर्धा : शहरातील सिव्हिल लाइन्स, आर्वी चौक तसेच इतर प्रमुख परिसरात मॅजिक बुक विक्री व सामाजिक कार्याच्या नावाखाली देणगी गोळा करणाऱ्या राजस्थान व गुजरात राज्यातील २१ महिलांचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या ७ अल्पवयीन बालकांचा गट पोलिस व महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आला.
गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गट शहरातील उच्चभ्रू भागांमध्ये फिरून नागरिकांकडून देणगी गोळा करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक सौरव कुमार यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस निरीक्षक संतोष टाले तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली.
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाने महिलांसह बालकांना ताब्यात घेऊन बालकल्यण समितीसमोर हजर केले. समितीने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
पुढील कार्यवाहीसाठी अहमदाबाद जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी समन्वय साधण्यात आला.
चौकशीत हा गट शहरातील मोहन धर्मशाळेत मुक्कामी असल्याचे समोर आले. महिलांची महिला पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत झडती घेण्यात आली असता देणगीदारांची यादी व विविध कागदपत्रे आढळून आली. मात्र कोणत्याही नोंदणीकृत संस्थेचे नाव अथवा नोंदणी क्रमांक उपलब्ध नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
आधारकार्ड व इतर कागदपत्रांच्या पडताळणीत संबंधित महिलांचे व्यवहार गुजरात मधील अहमदाबाद परिसरातून सुरू असल्याचे माहिती मिळाली. या प्रकरणाची अधिक शहानिशा करण्यात येत असून विविध यंत्रणांकडून माहिती संकलित केली जात आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे देणगी मागणाऱ्या संशयास्पद गटांना बळी पडू नये. भविष्यात अशा प्रकारची टोळी आढळल्यास तात्काळ पोलिस किंवा महिला व बालविकास विभागाला माहिती द्यावी.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, पोलिस उपनिरीक्षक बानोत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी, चाइल्ड हेल्पलाइनचे आशिष मोडक तसेच पोलिस, महिला व बालविकास विभाग, रेल्वे सुरक्षा बल आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.