वर्ध्याच्या ‘गोरस भंडार’वर, अन्न व औषध प्रशासनाचा मध्यरात्री छापा; २६ लाखाचा मोठा साठा जप्त करत आस्थापना सील
वर्धा: जिल्ह्यातच नव्हेतर अख्ख्या देशभरात प्रसिद्ध असलेला ‘गोरसपाक’ आणि शुद्ध दुग्धजन्य पदार्थासाठी ग्राहकांच्या उड्या पडणाऱ्या मगनवाडी येथील नामांकित ‘गोरस भंडार’ (मे. वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संस्था) या संस्थेचे अखेर पितळ उघडे पडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत, अत्यंत अस्वच्छ आणि अन्न कायद्याच्या निकषांना हरताळ फासणाऱ्या वातावरणात सुरू असलेल्या या गोरखधंद्यावर तुकाराम मुंडे याचा असा दणका पडला की संबंधित विभाग असा खडबडून जागा झाला की अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ३१ मे रोजी अचानक छापा टाकला.
या धडक आणि गोपनीय कारवाईत तब्बल २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा संशयास्पद तसेच असुरक्षित दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, सदर आस्थापना तातडीने बंद करण्याचे कडक आदेश प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे वर्ध्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, गोरस भंडारच्या आजवरच्या ‘विश्वासाहतेवर’ आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर कार्यालयाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नागपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी राऊत व राहुल खंडागळे, तसेच वर्ध्याचे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांच्या संयुक्त पथकाने मगनवाडी येथील उत्पादन केंद्राला अचानक भेट दिली.
कारवाईच्या वेळी तिथे गाईचे दूध, तूप, ताक (बटर मिल्क) आणि खवा हे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री व साठवणीसाठी अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार होत असल्याचे पथकाला रंगेहात आढळून आले.
तीव्र संशय आल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी तातडीने या चारही अन्नपदार्थाचे कायदेशीर नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तेथील रिपोर्ट आल्यावरच यातील बिंग बाहेर येईल.