हिंगणघाट : यशवंत नगर व रामनगर वॉर्डमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी व्होल्टेज आणि शॉर्टसर्किटच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. जुनी डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) जीर्ण झाल्यामुळे वारंवार डीपी जळणे, लाईट जाणे आणि तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या.
या समस्येची काल रात्री गंभीर दखल घेत नगरसेवक विकी वाघमारे यांनी संबंधित वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा करत नवीन डीपी बसवण्याची मागणी केली होती. त्यांच्या सामाजिक प्रयत्नांमुळे अखेर यशवंत नगर व रामनगर वॉर्डमध्ये नवीन डीपी स्वतः उपस्थित राहून MSEB च्या कर्मचाऱ्यांनी नवीन डीपी लावली.
नवीन डीपीमुळे आता वीजपुरवठा अधिक स्थिर होणार असून कमी व्होल्टेज, शॉर्टसर्किट आणि वारंवार लाईट जाण्याच्या समस्यांपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत नगरसेवक विकी वाघमारे यांचे आभार मानले आहेत. ‘नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच माझी बांधिलकी आहे,’ असे मत नगरसेवक विकी वाघमारे यांनी व्यक्त केले. ■