अजितदादा प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : अजितदादा पवार हे प्रत्येक क्षेत्रात दुरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या विकासात्मक कामाचा झपाटा व गती प्रचंड होती. त्यांच्या जाण्याने राज्याचा एक कणखर नेता, मार्गदर्शक हरवला आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे गेल्या २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी दादांविषयी आपल्या भावना व्यक्त करतांना पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते.

यावेळी वर्धा नगरपरिषदेचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंह, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित होणार होता. त्यावेळी दादांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणाच्याही दबावाखाली न येता सभागृहात योग्य भूमिका घेण्याची सूचना केली होती. सेवाग्राम विकास आराखडा पूर्णत्वास गेला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. सेवाग्राम सोलर ?न्ड सायन्स पार्कचा प्रस्ताव मी दादांकडे मांडला होता. हा प्रस्ताव मंजूर करू असे दादा म्हणाले होते. त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात हा प्रस्ताव पूर्ण होऊ शकला नाही याचे दु:ख आहे.

मंत्रालयातील दादांच्या कक्षात बारामती येथे कृषि विज्ञान केंद्रांची बैठक सुरु होती. बारामतीतील या केंद्रातील आधुनिक बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही पाहता याव्या यासाठी मी दादांना विनंती केली होती. त्यांनी संबंधितांना सांगून तातडीने व्यवस्था करून दिली. जिल्ह्यातील २६४ शेतकऱ्यांना बारामतीतील अत्याधुनिक कृषी विज्ञान केंद्र पाहता आले. त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला. दादा अतिशय दूरदृष्टीचे नेते होते. प्रत्येक क्षेत्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. अतिशय गतीने ते विकास कामे, प्रशासकीय कामे करायचे. अखेर घाईघाईने ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने समाजपयोगी काम करणारी व्यक्ती आपण गमावली आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे बोलतांना म्हणाले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना जिल्हाधिकारी वान्मथी सी म्हणाल्या, २०१९ पासुन दादांशी माझा परिचय होता. २०२२ मध्ये वित्त विभागात काम करत असतांना काही काळ त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. दादा आपले प्रशासकीय कामकाज अगदी सकाळपासुन सुरु करायचे. वर्धा येथे असतांना वेळेच्या आधीच ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. दादा अगदी स्थानिक पातळीवरचे नेते होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील प्रत्येकाचे नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण म्हणाले, २००७ पासुन दादांशी माझे संबंध होते. दादा त्यावेळी जसे होते तसेच आज देखील होते. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकसित होत होता. चांगले आणि गुणवत्ता पूर्वक कामे करण्याचा दादांचा कटाक्ष होता. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले, दादा जे बोलायचे ते करायचे. त्यांचे कार्य राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिले आहे.

राज्याच्या जडणघडणीत, नव क्षितीज निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शासन, प्रशासनात त्यांच्या कामाचे प्रतिबिंब दिसून आले पाहिजे, हीच त्यांना खरी श्रध्दांजली असेल. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व उपस्थिती सर्व मान्यवरांनी अजितदादांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. सुरुवातीस दोन मिनीटे स्तब्ध राहून मौन पाळण्यात आले. श्रध्दांजली सभेस सर्व जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन नायब तहसिलदार अतुल रासपायले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *