खासदार अमर शरदराव काळे यांची मागणीवर्धा : सिंदी रेल्वे येथे लॉजिस्टिक पार्कची निर्मिती करण्याची घोषणा केल्याने या जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगार मिळण्याबाबतच्या मोठ्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या कच्च्या मालाला बाजार उपलब्ध होणे, बेरोजगारांना न्याय स्थानिकांना व्यवसाय व आर्थिकदृष्ट्या बाजारातील देवाणघेवाण या पार्कमुळे नक्कीच वाढणार अशी मोठमोठी स्वप्ने घोषणा करते वेळी जनतेच्या मनात निर्माण करून दिल्याने व आता या प्रकल्पाची प्रगती किंवा अवस्था पाहता या सर्वांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने खासदार अमर काळे यांनी या प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. विदर्भाचे प्रगतीचे ग्रोथ इंजिन म्हणून पुढे करण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क विदर्भातील बेरोजगारांचे आशास्थान समजल्या जातो.
सन २०१४ ला आपण सिंदी येथे ड्रायपोर्ट प्रकल्पाची घोषणा केली होती व त्यावेळी या प्रकल्पाची माहिती देताना वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांमध्येच नव्हे तर या संबंधित सर्व स्तराच्या लोकांमध्ये एक प्रकारची आशा निर्माण झाली होती. परंतु सन २०१४ ते २०२४ दहा वर्षात या ड्रायपोर्ट प्रकल्पाचे काहीही झाले नाही व हा प्रकल्प बंद पडला.
त्यानंतर नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट व जे एन पी टी यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून ६७३ कोटी रुपयाचा १५० एकरावर महाराष्ट्रातील पहिला मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क हा प्रकल्पाची घोषणा झाली व दि. १४ मार्च २०२४ ला लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन करताना या भागातील शेतकऱ्यांपासून तर सामान्य बेरोजगारांमध्ये आपल्या भाषणातून आशा निर्माण केल्या. या प्रकल्पासाठी येथील शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी प्रकल्पाला दिल्यात. घरापाशी आपल्याला शेतीपूरक व्यवसाय मिळेल, आपल्या बेरोजगार मुलाबाळांच्या हाताला काम मिळेल व जिल्ह्यात एक मोठा उद्योग निर्माण होईल अशी आशा जिल्ह्यातील लोकांना आहे.
गेल्या ३६ वर्षांपासून ५३५ एकर जमीन पडून आहे. वारंवार वेगवेगळ्या ड्रायपोर्ट ते मेट्रो कारखाना अशा वेगवेगळ्या प्रकल्पाच्या फक्त घोषणा बदलत गेल्या व आज या प्रकल्पाच्या ठिकाणी जमिनीवर फक्त संरक्षक भिंत व रेल्वे रूळ दिसतात.
सध्या या ठिकाणी एक शेड टीनाचे कॅम्प सारखे कार्यालय व ७ सुरक्षा रक्षक आहेत. बाकी संपूर्ण काम बंद आहे असे स्थानिकांकडून कळते. या प्रकल्पा विषयी स्थानिक लोकांना व जिल्ह्यातील बेरोजगारांना या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्यातील बेरोजगारांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊन त्यांच्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रकल्प शासनाने तात्काळ पूर्ण करून जिल्ह्यातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावावा अशी विनंती खासदार अमर काळे यांनी व्यक्त केली.