मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मुंबई मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार राजेशभाऊ बकाणे आणि स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली.
यावेळी आमदार राजेशभाऊ बकाणे यांनी वर्धा जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबत मंत्र्यांचे लक्ष वेधले. तर संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी नोंदणी, नूतनीकरण, प्रोफाईल दुरुस्ती, विविध कल्याणकारी योजनांचे प्रलंबित अर्ज, आर्थिक सहाय्य, शैक्षणिक व आरोग्यविषयक अनुदान तसेच इतर लाभांच्या वितरणामध्ये होत असलेल्या विलंबाची सविस्तर माहिती मंत्र्यांना दिली. वर्धा जिल्ह्यातील हजारो पात्र बांधकाम कामगारांचे अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून त्यामुळे कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब आमदार राजेशभाऊ बकाणे व उमेश अग्निहोत्री यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सर्व प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत, कामगारांना न्याय मिळावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शक व सुलभ पद्धतीने मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
यावर कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकर यांनी संबंधित प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच नागपूर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या भेटीमुळे वर्धा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा अधिक बळकट होईल, असा विश्वास आमदार राजेशभाऊ बकाणे व स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.