शहरीकरणाला अभिशाप न मानता संधी माना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे हिंगणघाट – दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. शहरातील वाढत्या रोजगाराच्या संधींमुळे शहरांचे आकारमान मोठे होत आहे. परंतु या शहरीकरणाला अभिशाप न मानता संधी मानावे. शहरी विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून विविध योजना राबविल्या जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंगणघाट येथे २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणूक भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोकुलधामवर आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, रिपाईं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, हिंगणघाट नगरपरिषद भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर व सिंदी (रेल्वे) नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणी कलोडे आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरी जीवनमान उंचावणे हे काळाची गरज आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

मागील ६० वर्षात सत्ताधारी काँग्रेसच्या काळात या बाबींकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी शहरीकरणामुळे समस्या वाढत गेल्या. योग्य नियोजन न केल्याने शहरांमध्ये झोपडपट्टी अतिक्रमण पिण्याच्या पाण्याची कमतरता, सांडपाणी निचरा नियोजनाचा अभाव, त्यामुळे प्रदूषित होणारे नदी, नाले, वाढती रोगराई यामुळे शहरी जीवनमान रसातळाला गेले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांकडे लक्ष देऊन शहरी विकासाकरता विविध योजना राबविल्या. या अंतर्गत अटल अमृत योजना, स्वच्छ भारत योजना आदी योजनेअंतर्गत कोट्यावधीचा निधी दिल्याने शहर विकसित होत आहे.

मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात जात आहे जल स्त्रोत प्रदूषित होणार नाही. याकरिता भुयारी गटारी योजना सुमारे २०० शहरांमध्ये राबविल्या जात आहे. प्रदूषणाला आळा घालण्याकरिता घनकचरा टेक्नॉलॉजी उपयोगात आणल्या जात आहे. त्यामुळे भारतातली शहरे विकसित होत असून रोजगाराच्या नवीन संधी शहरात उपलब्ध होत आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *