प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : राज्य शासनाने गोर गरीबांना तब्बल तीन महिन्यांचे मोफत राशन वाटप सुरु केले आहे. हे मिळणारे राशन गहू, तांदूळ नागरिक विकत असतात याचे हब वर्धा एमआयडीसी, सावंगीजवळ होते. परंतु पुरवठा अधिकाऱ्यांच्या कारवाईने हे बंद झाले.
सस्त धान्य खरेदीचे केंद्र आता पुलगांव झाले असून याकडे मात्र पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. राशन दुकानातून मिळणारे धान्य नागरिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यानंतर हे धान्य भरून जास्त दराने पुलगांव येथे विकत असल्याची माहिती मिळत असून या व्यवहारात एका डॉक्टरांचाही समावेश असल्याने चर्चेला उधाण आले आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी वर्धा एमआयडीसी परिसरात जमा होणाऱ्या या धान्य गोदामांवर धाड टाकली होती, त्यानंतर हे बंद झाले. परंतु आता पुलगांव येथे नाचणगांव मार्गावर असलेल्या गोडाऊनमध्ये हेच धान्य खरेदी करण्यात येत असून याकडे मात्र अजूनपर्यंत पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन यांचे लक्ष गेले नाही. येथे यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावातील आणि वर्धा जिल्ह्यातील सस्त धान्य दुकानांचे गहू, तांदूळ मोठ्या प्रमाणात येत आहे.
या व्यवसायात पुलगांव येथील अनेक जण गुंतलेले आहेत. तर पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीनेही या व्यवसायात उडी घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.