करंजी-काजी, पुलगांव-दहेगांव मार्गावर सेलू तालुक्यात अवैध डिझेल पेट्रोल तस्करी चालूच
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : वर्धा शहराच्या चारही बाजूंनी अवैध डिझेल, पेट्रोल तस्करीचा धंदा फोफावत आहे. काही दिवसांपूर्वीच सेलू येथील पुरवठा अधिकाऱ्याने या अवैध व्यवसायावर धाड टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अवैध डिझेल, पेट्रोल तस्करांनी त्यांच्याच वाहनांचे नुकसान करून पलायन केले होते. ही घटना ताजी असतानाच सेलू तालुक्यातील तुळजापूर महामार्गावर पुलाच्या आजूबाजूला झाडाझुडपात हा तस्करीचा व्यवसाय जोमात चालू झाला आहे. आजूबाजूच्या झाडाझुडपात हा व्यवसाय तस्कर करीत असून निमगांव येथून येणाऱ्या टँकर थांबवून हा व्यवसाय चालू आहे, तर वर्धा-समुद्रपूर मार्गावर असलेल्या करंजी काजी येथील एका ढाब्यावर हा व्यवसाय राजरोसपणे चालू आहे.
या व्यवसायाला आशीर्वाद कुणाचे यावर खमंग चर्चा चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यवसायात अनेक समाजभिमुख समजणारे नेते सहभागी असून त्यांच्या आशीर्वादाने हा धंदा चालू आहे. वर्धा-पुलगांव मार्गावर दोन ढाब्यांवर हा व्यवसाय चालू असून याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. पुरवठा अधिकारी, पोलिस प्रशासन, बघ्यांची भूमिका घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध डिझेल पेट्रोल व्यवसाय जोमाने वाढत आहे. सेवाग्राम-समुद्रपूर मार्गावर करंजी काजीजवळ असलेल्या ढाब्यावरून हा व्यवसाय चालू असून सोनु या नावाची चर्चा चालू आहे. सोनु कोण, त्याला आशीर्वाद कुणाचे याची खमंग चर्चा चालू असून गावकऱ्यांनीही या ढाब्यावर अवैध डिझेल, पेट्रोलचा व्यवसाय चालतो अशी माहिती दिली आहे. परंतु कारवाई करणारे अधिकारी मात्र गप्प आहे. अनेक पांढरपेशे नेते यांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय चालू असल्याचे समजते.