खासदार अमर काळे यांचे महसूल प्रधान सचिवांना पत्र महामार्गालगत अवघ्या ७० मीटरवर परवानगी; नियमभंगाचा आरोप, उत्खनन थांबवण्याची मागणी
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : बुटीबोरी-तुळजापूर समृद्धी महामार्गालगत केळझर येथील टेकडी उत्खनन प्रकरण आता चांगलेच तापले असून, या संदर्भात खासदार अमर काळे यांनी थेट प्रधान सचिव, महसूल, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
खासदार काळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, वर्धा लोकसभा मतदारसंघातील केळझर परिसरात महामार्गालगत अवघ्या ७० मीटर अंतरावर टेकडी उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षिततेला धोका व या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, परिसरातील गावांमध्ये पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. टेकडी उत्खननामुळे धुळीचे प्रमाण वाढून श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, तसेच पाणी स्रोतांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, २०१३ च्या गौण खनिज नियमांनुसार राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आत उत्खननास मनाई असताना, केवळ ७० मीटर अंतरावर परवानगी देण्यात आल्याने नियमभंग झाल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित परवानगी तात्काळ रद्द करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्खननाचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी त्यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.